मनसेच्या इशाऱ्यानंतर ...घाणेकरचे ४ शो लावण्यास मल्टिप्लेक्सचालक तयार

मराठी सिनेमांना प्राइम टाइम न मिळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. कल्याणमध्ये 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाला प्राइम टाइम देण्यात न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ...घाणेकरला प्राइम टाइम न दिल्यास खळ्ळखट्याक करण्याचा इशारा मनसेने मल्टिप्लेक्स चालकांना दिला. या इशाऱ्यानंतर मल्टिप्लेक्सचालकाने या सिनेमाचे शो वाढवण्याचं लेखी आश्वासन मनसेला दिलं.

'शो' मध्येही तफावत

कल्याणच्या सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये 'आणि काशिनाथ घाणेकर' या सिनेमाचा केवळ एकच शो लावण्यात आला आहे. हा शो दुपारी ३ वाजेचा असल्याने प्रेक्षकांसाठी गैरसोईचा ठरत आहे. या उलट याच मल्टिप्लेक्समध्ये दुसऱ्या स्क्रीनवर अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा लावण्यात आला आहे. या सिनेमाला प्राइम टाइमसोबत एकूण ८ शो देण्यात आले आहेत.

प्रेक्षकांची पसंती

'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा मल्टिस्टारर असूनही या सिनेमाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. तर मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत आहे.

नाहीतर...

परंतु ...घाणेकरचा एकमेव शो असल्याने प्रेक्षकांना या सिनेमाचा आस्वाद लुटण्यास मर्यादा येत असल्याचा दावा मनसेने केला. कल्याणमध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. तसंच ...घाणेकर सिनेमा चांगली कमाई करत असतानाही, सिनेमाला प्राइम टाइम न मिळणे हे अन्यायकारक असल्याचं मनसेचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठी सिनेमाला प्राइम टाइम न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे.

अखेर आंदोलनच्या धसक्याने नरमून मल्टिप्लेक्स चालकाने या सिनेमागृहात ...घाणेकरचे ४ शो लावण्याचं लेखी आश्वासन मनसेला दिलं आहे. सोबतच सिनेमाचे शो वाढवण्याची हमीही दिली आहे.


हेही वाचा-

सागर देशमुख घडवणार भाईंचं दर्शन!

झीरोच्या अडचणीत वाढ, चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या