कल्याणच्या नचिकेत लेलेने केला दंगा, ठरला सारेगमपचा महाविजेता!

मराठी गायन विश्वामध्ये सर्वात नावाजलेला रिअॅलिटी शो असलेला सारेगमपचा रविवारी महाअंतिम सोहळा पार पडला. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि परदेशात असलेल्या मराठी जनांना ज्याची उत्सुकता होती, तो निकाल जाहीर झाला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. इतर पंगेखोरांशी काँटे की टक्कर देत कल्याणच्या नचिकेत लेलेने बाजी मारली आणि सारेगमपच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

३६ स्पर्धक, १२ पंगेखोर!

अवघ्या महाराष्ट्रातून घे पंगा कर दंगा असं आव्हान देत ३६ पंगेखोर सारेगमपच्या विजेतेपदासाठी मुंबईत दाखल झाले. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादासह त्यातले १२ पंगेखोर महाअंतिम फेरीमध्ये दाखल झाले. आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यात कार्यक्रमातल्या एक्झिट पोलने कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली.

रविवारी दुपारपासूनच गोरेगावच्या फिल्मसिटीला सारेगमपच्या महाअंतिम सोहळ्याचा साज चढायला सुरूवात झाली होती. मोठ्या संख्येने आपल्या आवडत्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक हजर झाले होते. त्यासोबतच या सर्व १२ पंगेखोरांचे कुटुंबियही हजर होते. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. स्पर्धकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरही महाअंतिम सोहळ्याचा ताण दिसून येत होता. त्यामुळे हा महाअंतिम सोहळा काँटे की टक्कर असणार हे निश्चित झालं होतं!

पहिल्यांदाच अंतिम सोहळा लाइव्ह!

यंदा पहिल्यांदाच महाअंतिम सोहळा प्रेक्षकांना लाईव्ह पहायला मिळाला. त्यामुळे फिल्मसिटीमध्ये आलेल्या प्रेक्षकांसोबतच घराघरात आपल्या लाडक्या पंगेखोराला गाताना पहायची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळाली.

सर्व स्पर्धकांचे एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स झाल्यानंतर अखेर निर्णयाचा क्षण आला. हा निर्णय जाहीर करताना स्पर्धकांसोबतच परीक्षकांवरही तणाव दिसत होता. सर्वच पंगेखोरांचे परफॉर्मन्स तितक्याच ताकदीचे झाल्यामुळे कुणाला विजेतेपद द्यावं? हा एक मोठा निर्णय परीक्षकांना घ्यायचा होता. पण अखेर तिन्ही परीक्षकांनी नचिकेतचं नाव जाहीर केलं आणि स्टुडिओसकट बाहेर गर्दी केलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

महाविजेत्यावर बक्षिसांची खैरात!

विजेत्या पंगेखोराला ५ लाख रूपये आणि झी मराठीच्या एका मालिकेचे शिर्षक गीत गाण्याची संधी मिळणार आहे. तर उपविजेत्याला ३ लाख रूपये आणि एका मालिकेचे शिर्षक गीत गाण्याची संधी मिळणार आहे.

पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, मनवा नाईक, निलेश मोहरीर, हृषिकेश जोशी अशा मराठी स्टार्सनी या महाअंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

Winners

Nachiket lele - Kalyan

Ujjwal gajbal - Yawatmal

Akshay Ghanekar - Pune


हेही वाचा

'सारेगमप'ला मिळाली नवीन अॅँकर!

पुढील बातमी
इतर बातम्या