'तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील नट्टू काका यांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं कर्करोगानं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटरवर घनश्याम नायक यांच्यासोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
त्यासोबत त्यांनी लिहलं आहे की, “गेल्या काही दिवसात, आम्ही दोन प्रतिभावान अभिनेते गमावले आहेत ज्यांनी त्यांच्या कसदार भूमिकेमुळे लोकांची मने जिंकली होती. श्री. घनश्याम नायक त्यांच्या उत्तम भूमिकांसाठी नेहमीच लक्षात राहतील. खास करुन ‘तारक मेहता..’ मधील त्यांच्या नट्टू काका यांच्या भूमिकेसाठी. ते खूप प्रेमळ, दयाळू आणि नम्र होते.”
मोदींनी शेअर केलेल्या या फोटोत मालिकेत बागाची साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया, मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी, आणि घनश्याम नायक पंतप्रधान मोदी यांच्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहे.
घनश्याम नायक ‘तारक मेहता …’या मालिकेत वयाच्या ७७ व्या वर्षापर्यंत काम करत होते. मात्र कॅन्सरवर उपचार सुरू असल्यानं त्यांनी हा शो सोडला. ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘चाइना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’, ‘खाकी’ या सारख्या अनेक सिनेमांमध्ये घनश्याम नायक यांनी महत्वाच्या भूमिका साकाराल्या होत्या.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन मंगळवारी रात्री मुंबईत झालं. अरविंद त्रिवेदी बराच काळ आजारी होते. हृदयविकारच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटाव्यतिरिक्त अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. ते गुजराती सिनेमासृष्टीतील एक महत्त्वाचा भाग होते.
पंतप्रधान यांनी अरविंद यांना श्रद्धांजली देत एक ट्विट केलं, ” श्री अरविंद त्रिवेदी हे आज आपल्यात नाहीत, ते एक उत्तम कलाकार होते. तसंच ते उत्तम समाजसेवक देखील होते. भारताच्या येणाऱ्या सर्व पिढ्या, त्यांना रामायण या मालिकेतील त्यांच्या कामासाठी कायम स्मरणात ठेवतील. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.ओम शांती.”
हेही वाचा