'पद्मावत'च्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सरसावली!

सध्याचा 'पद्मावत' आणि पूर्वीच्या 'पद्मावती' सिनेमावरून उठलेलं वादळ सर्वच प्रेक्षकांनी पाहिलं. त्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी आणि इतर भाषिक चित्रपट सृष्टींनीही 'पद्मावत'ला पाठिंबा दिला. अखेर सर्व वाद आणि भांडाभांड केल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सिनेमा प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली. इतकंच नाही, तर थेट सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना फैलावर घेतलं.

कायदा-सुव्यवस्थेसाठी निर्णय

पण एवढं होऊनही 'पद्मावत'मागचं शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नाव घेत नाहीये. सिनेमातला आक्षेपार्ह भाग वगळण्यात आला आहे. मात्र तरी, कर्णी सेनासारख्या संघटनांनी सिनेमाला असलेला विरोध कायम ठेवला आहे. त्यामुळे सिनेमा जेव्हा प्रदर्शित होईल, तेव्हा सिनेमागृहांना संरक्षण देण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या दृष्टीकोनातून पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितलं.

कर्णी सेना भूमिकेवर ठाम

चित्रपटाच्या घोषणेपासून वादात अडकलेल्या 'पद्मावत' सिनेमाचं काही दिवसांपूर्वीच नाव बदलण्यात आलं आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह भागही सेन्सारने वगळला. मात्र, तरीही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. त्या विरोधात दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानं कोर्टाने दिलासा देत सिनेमा प्रदर्शित करण्याचे आदेश दिले खरे. मात्र, कर्णी सेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. तसेच वेळ पडल्यास चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी हातात तलवारी घेण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी आता चित्रपट दाखवणाऱ्या सिनेमागृहांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

दीपिका-राणवीरलाही पोलिस सुरक्षा

'पद्मावत' सिनेमाला वाढता विरोध पाहता, या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना देखील सुरक्षा पुरवणार असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या