काही कलाकार मालिका आणि सिनेमांच्या कामात इतके बिझी होतात की रंगभूमीवर काम करण्याची इच्छा असूनही त्यांना वेळ काढणं कठीण जातं. अशीच बिझी राहिलेली सोनाली खरे मात्र करियरच्या एका महत्त्वाच्या वळणावर नाट्यभरारी घेत रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवत आहे. ‘हृदयांतर’ या सिनेमानंतर ‘Bye Bye बायको!’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर दाखल होत असल्याचं औचित्य साधत सोनालीने ‘मुंबई लाइव्ह’शी गप्पा मारल्या.
रंगभूमीवर काम न केल्याचं शल्य
बरेचसे मराठी कलाकार रंगभूमीवरून सिनेसृष्टी तसंच मालिका विश्वाकडे वळतात. पण काही कलाकार मात्र याला अपवाद आहेत. आपल्या मनमोहक अदाकारीमुळे ते थेट सिनेमा किंवा मालिकांमधून करियर सुरू करतात. अशा कलाकारांना नेहमीच रंगभूमीवर काम न केल्याचं शल्य सतावत असतं. इच्छा असूनही वेळ नसल्याने नाटकात काम करणं शक्य होत नाही. त्यामुळेच सोनाली खरेसारखी एखादी अभिनेत्री आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जेव्हा रंगभूमीकडे वळते, तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधून घेते.
इच्छा होतीच
सुरुवातीच्या काळात मी सिरीयल्स आणि सिनेमांमध्ये खूप बिझी होते. त्यामुळे नाटकात काम करणं शक्य झालं नाही. इतर मित्र-मैत्रीणींप्रमाणे आपणही नाटकात काम करून रसिकांची दाद मिळवावी असं खूप वाटत होतं. पण एकाच वेळी तिन्ही माध्यमांमध्ये काम करणं पॅासिबल नव्हतं. नाटकापासून मी मुद्दामहून दूर राहिले नाही.
मला वाटतं प्रत्येक गोष्टीसाठी योग जुळून यावा लागतो. आधी मी बिझी होते. नंतर दोन नाटकांच्या आॅफर्स आल्या. पण काही कारणांमुळे पुढे वर्कआऊट झालं नाही. एक-दीड वर्षांपूर्वी एका नाटकाबाबत बोलणीही झाली होती. पण त्याचंही पुढे काही झालं नाही. त्यामुळेच कोणतीही गोष्ट वेळेअगोदर होत नाही असं मला वाटतं.
माझ्यासाठी नवा बाज
‘Bye Bye बायको!’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर एंट्री करताना थोडी नर्व्हसही आहे आणि उत्सुकही... थोडी भीतीही आहे आणि इच्छापूर्ती होण्याचा आनंदही... खरं तर या नाटकाचा बाज माझ्यासाठी नवा आहे. कॅामेडी नाटक आहे. लाईट हार्टेट कॅामेडी असल्याने अशा प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची माझी पहिलीच वेळ आहे.
या नाटकात प्रियदर्शन जाधव, हृषिकेश जोशी यांसारखे काॅमेडीतील मास्टर कलाकार आहेत. त्यांचं विनोदातील टायमिंग अचूक आहे. माझ्यासाठी मात्र विनोदी फार्स नवीन आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडी भीती वाटली होती. पण संपूर्ण टीम चांगली असल्याने टेन्शन आलं नाही. इथे कोणीही आपली भूमिका सरस व्हावी यासाठी चढाओढ करत नाही, तर सर्वजण नाटक चांगलं व्हावं यासाठी कष्ट घेत आहेत. सोनाली पंडीत, नेहा शितोळे, स्नेहा काटे यांच्याही या नाटकात भूमिका आहेत.
या नाटकात मी शीर्षक भूमिका साकारत आहे. प्रियदर्शनने साकारत असलेला दिग्दर्शक खूप वर्षे दिग्दर्शन करत आहे. पहिल्या बायकोच्या निधनानंतर त्याचं दुसरं लग्न झालेलं आहे. अशातच त्याची पहिली बायको भूत बनून परतते. ती परत आल्यावर जी पळापळ होते ती या नाटकात पाहायला मिळेल. पहिल्या बायकोची भूमिका मी साकारत आहे. थोडी लव्हली थोडी सायको अशी काहीशी कथा आहे.
दिग्दर्शक निरज सुरवईकर व सुदीप मोडक या तरुण दिग्दर्शकांनी ‘Bye Bye बायको!’ या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी ‘एक शून्य तीन’ या नाटकाचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने कोणतं कॅरेक्टर कोणी, कसं करावं हे त्यांच्या डोक्यात क्लीअर होतं. त्यामुळे कुठेच गोंधळ झाला नाही. नरेन चव्हाण आणि अभिजीत साटम यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.
बरेच नाट्यदिग्दर्शक मला आवडतात. पण नावच सांगायचं तर विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचं नाटक माझ्या मनाला नेहमीच भुरळ घालतं. नाटक सादर करण्याची त्यांची शैली खूप वेगळी आहे. त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे खूप चांगली लर्निंग प्रोसेस ठरेल.
दिग्दर्शन करण्याचा विचारही माझ्या मनाला शिवलेला नाही. पण निर्मिती नक्कीच करेन. मी कायम स्वत:ला विद्यार्थी समजून शिकत राहते. त्यामुळे दिग्दर्शन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निर्मिती करेन, पण अद्याप काही ठरवलेलं नाही.
हेही वाचा -
‘दोस्तीगिरी’ सिनेमाचा ट्रेलर-संगीत अनावरण सोहळा
वास्तववादी सिनेमासाठी अभिनेत्री बनली निर्माती