दुसरी कहानीसुद्धा सुफळ, संपन्न...

  • मंदार जोशी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

तरुण दिग्दर्शकांच्या फळीतील एक अत्यंत आश्वासक नाव म्हणजे सुजॉय घोष. या दिग्दर्शकाला चित्रपट माध्यमाची किती चांगली जाण आहे, याचा पुरावा म्हणजे त्याचे यापूर्वीचे झंकार बीटस, कहानी, तीन हे चित्रपट. तो जेवढा चांगला दिग्दर्शक आहे, तेवढा लेखकसुद्धा २०१२ मध्ये आलेल्या कहानी चित्रपटामुळे तर त्याच्याबद्दलच्या अपेक्षा खूपच उंचावल्या होत्या. मात्र कहानीला त्यानं ज्या उंचीवर नेवून ठेवलं होतं, ती उंची कहानी २ गाठू शकेल का? हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. एखाद्या चांगल्या कलाकृतीची दुसऱ्या भागामध्ये माती झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मात्र कहानी २ पाहिल्यानंतर पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाचंही घोष यांनी सोनं केल्याची खात्रीही पटते. सुजॉयनं काही महिन्यांपूर्वीच आलेल्या तीन चित्रपटांमध्ये कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर एक अप्रतिम गूढकथा सादर केली होती. विशेष म्हणजे कहानी २सुद्धा कोलकात्यामध्येच घडतो. वर्तमान आणि भूतकाळाचे तुकडे एकत्र करीत उत्तम टीमवर्कमुळे ही कहानी सुफळ, संपन्न बनली आहे.

कहानी २ ची वनलाईन आहे, एका आईनं आपल्या मुलीचा घेतलेला शोध. या वनलाईनवर सुजॉय घोष, सुरेश नायर (कथा), सुजॉय घोष (पटकथा), रीतेश शहा, सुजॉय घोष (संवाद) या त्रयीनं लेखनाच्या आघाडीवर अत्यंत उत्तम चोख केलं आहे. चित्रपट प्रारंभापासून शेवटापर्यंत जमण्याचं सर्वात मोठं श्रेय हे लेखकांनाच आधी द्यायला हवं. चित्रपटाचं कथानक थोडक्यात सांगायचं झाल्यास इथं आपल्याला मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळते ती विद्या सिन्हा (विद्या बालन). एके दिवशी ऑफिसमधून घरी आल्यावर तिला आपली अपंग मुलगी मिनू घरात नसल्याचं कळतं. याच वेळी एक फोन येतो आणि मिनूचं अपहरण झाल्याचं सांगितलं जातं. मिनूच्या सुटकेसाठी विद्याला एका ठिकाणी जावं लागणार असतं. आपल्या मुलीच्या सुटकेसाठी विद्या तिथं जात असतानाच तिला अपघात होतो आणि ती कोमात जाते. अपघाताची ही केस सांभाळत असतो तो इन्स्पेक्टर इंदरजितसिंग (अर्जुन रामपाल). विद्याला पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसतो. कारण या विद्याचा चेहरा त्याच्या पूर्वायुष्यात आलेल्या व्यक्तीशी अगदी मिळताजुळता असतो. तसेच या विद्याचे धागे एका कुख्यात गुन्हेगार दुर्गा राणी सिंगशीही जोडले गेलेले असतात. विद्याकडील डायरीमधून त्याला आणखी धक्कादायक गोष्टी उकलायला लागतात आणि रहस्य, थराराचा एक नॉनस्टॉप प्रवास सुरू होतो. या प्रवासाचा जेव्हा शेवट होतो तेव्हा पाहणाऱ्याला आपण काहीतरी भयंकर पाहिल्याचं समाधान नक्की मिळतं.

दिग्दर्शक सुजॉय घोषनं आपल्या हातामधील असलेल्या उत्कृष्ट कथानकातील वेगवेगळ्या घटनांचे पत्ते चित्रपटात योग्य जागी खेळले आहेत. सतत फ्लॅशबॅकचा वापर असूनही हा चित्रपट कुठंही रेंगाळत नाही. रहस्याचे धागे छान गुंफत नेवून त्याची उकलही तितक्याच सफाईदारपणे केली आहे. चांगल्या दिग्दर्शकाची ओळख दिसते ते त्याच्या इनडोअर आणि आऊटडोअर शूटिंग हाताळणीत. या दोन्ही आघाड्यांवर हा चित्रपट जमून आला आहे. कोलकाता आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश चित्रपटात खूप छान पद्धतीनं आला आहे. याचं श्रेय सिनेमॅटोग्राफर तपन बासू यांना द्यायला हवं. चित्रपटाचा बाज गंभीर असला तरी दिग्दर्शकानं विविध पात्रांमधून वेगळा आणि चांगला विनोद सतत पेरत ठेवला आहे. त्यामुळेच चित्रपटामधील गंभीर आशय फारसा अंगावर येत नाही. लेखक-दिग्दर्शकानं एवढी चांगली डिश तयार ठेवल्यानंतर अभिनेत्यांनी त्याचा आस्वाद घेतला नसता तरच नवल. विद्या बालन, अर्जुन रामपाल या मुख्य कलाकारांखेरीज इतर छोट्या-मोठ्या भूमिका साकारणार्या कलावंतांनी या डिशचा नुसताच आस्वाद घेतला नाहीय तर त्यावर मनसोक्त ताव मारला आहे. चित्रपटाच्या मूडला साजेसं संगीत क्लिंटन सेरेजो यांनी दिलं आहे.

लेखन- १, दिग्दर्शन- १, तांत्रिक कामगिरी- १ आणि अभिनयाला १ असे चार स्टार मी या चित्रपटाला देतो. थोडक्यात न चुकवण्याजोगा असा हा अनुभव आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या