विजय स्टारर मास्टर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ४२ कोटींची कमाई

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थालीपती विजय आणि विजय सेतुपती स्टारर अ‍ॅक्शन-थ्रीलर फिल्म 'मास्टर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळवली आहे. रिपोर्ट्सनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जगभरात ४० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

कोरोना काळातील हा पहिला चित्रपट आहे, ज्याला बंपर ओपनिंग मिळाली. लोकेश कानगराज दिग्दर्शित हा चित्रपट बुधवारी तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. याचे हिंदी व्हर्जन गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.

मास्टर या चित्रपटानं तामिळनाडूत २३ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. केरळ आणि कर्नाटकात चित्रपटाचा प्रत्येकी तीन तीन कोटींचा व्यवसाय झाला आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बेल्टमध्ये 'मास्टर'नं साडेचार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्याचबरोबर उर्वरित देशात दीड कोटींहून अधिकचा व्यवसाय चित्रपटानं केला आहे. या सर्वाखेरीज या चित्रपटानं ओवरसीज मार्केटमध्ये ४ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला.

मास्टरच्या ग्रॅण्ड रिलीजनंतर व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, "बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आली आहे. मास्टर या चित्रपटाची एक जबरदस्त सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना जे पहायचे आहे ते तुम्ही द्या, प्रेक्षक कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत. मोठ्या पडद्यावर उत्कृष्ट कलाकृती बघणे कधीच थांबणार नाही.'

या चित्रपटात विजय आणि विजय सेतुपती यांच्याव्यतिरिक्त मालविका मोहनन, शांतनु भाग्यराज, अर्जुन दास आणि नसीर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि सहलेखक रत्न कुमार यांनी या चित्रपटात स्पेशल अपिअरन्स दिला आहे.


हेही वाचा

सोनू सूदच्या अवैध बांधकामप्रकरणी हायकोर्टानं निकाल राखून ठेवला

'फायटर'मध्ये हृतिक रोशनसोबत झळकणार दीपिका पदुकोण

पुढील बातमी
इतर बातम्या