नवी मुंबई : दर आठवड्याला खारफुटी जंगलातून निघतोय २०० किलो कचरा

१५ ऑगस्टपासून एन्व्हायर्नमेंट लाइफ नावाच्या पर्यावरण संस्थेनं नवी मुंबईतील खारफुटीच्या जंगलांमधून दर रविवारी सुमारे २०० किलो कचरा साफ केला आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, या संस्थेनं गेल्या रविवारी जंगलांमधून एक हजाराहून अधिक कचरा साफ केला आहे. यात शूज, चप्पल, सँडल तसेच बल्ब, प्लास्टिक कचरा, बांधकामाचे सामान आदीचा समावेश होता. समुद्रात टाकलेला कचरा समुद्रातून किंवा खाड्यांमधून जात असताना खारफुटीच्या जंगलांमध्ये अडकतो.

त्यामुळे इतर ठिकाणापेक्षा खारफुटीच्या जंगलात अधिक कचरा आढळतो. म्हणूनच, सरकार या समस्येवर तोडगा काढेपर्यंत पर्यावरणासाठी काम करणारी एन्व्हायर्नमेंट लाइफ ही संस्था दर आठवड्याला ही मोहीम राबवते.

जुलै महिन्यात नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलच्या प्रधान खंडपीठानं महाराष्ट्र सरकारला खारफुटीवर जमा होणाऱ्या कचऱ्याच्या एकूण प्रमाणावर सखोल अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच जंगलातून साफ केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या योजनेसंदर्भातही माहिती देण्यास सांगितलं आहे.

वनविभागाच्या खारफुटी विभागानं याआधी सांगितलं होतं की, मुंबईतील खारफुटीच्या जंगलात सुमारे ६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे ५० हजार टन प्लास्टिक कचरा पसरला आहे. शिवाय, नद्या, खाड्या आणि समुद्रालाही प्लास्टिक कचर्‍यानं धोका आहे. लोकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे समुद्र प्रदूषित होत आहे. MPRBनं असंही नमूद केलं आहे की, शहरातील खारफुटी आणि आसपासच्या परिसरात सुमारे ९३ टक्के प्रदूषण हे प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे झाले आहे.


हेही वाचा

मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित, पाराही चढला

आरेतील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या