मॉन्सून अंदमानात दाखल!

मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली असतानाच मॉन्सून अंदमानात दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मॉन्सून यंदा सात दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे.

यावर्षी अल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे तसेच मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मॉन्सून अंदमान आणि निकोबार द्विपसमुहात दाखल झाला आहे. गेल्या वर्षी मॉन्सून 18 मे रोजी दाखल झाला होता. अंदमानात दाखल झाल्यावर मॉन्सून साधारण एक आठवड्याच्या कालावधीत केरळमध्ये पोहोचतो व नंतर कोकण किनारपट्टीवर येतो. या वर्षी मॉन्सूनची प्रगती समाधानकारक असल्यामुळे मॉन्सून मंगळवारपर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच देशात सरासरीइतका पाऊस पडण्याचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबईत अजूनही काही दिवस ढगाळ वातावरण आणि उकाडा -
गेल्या दोन दिवसांत मुंबईत मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असुन वातावरण ढगाळ असल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून मुंबईकरांना घाम गाळावा लागत आहे. येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 33.8 अंश कमाल आणि 28.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सांताक्रूझ येथे 34.2 अंश कमाल आणि 26.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या