'आरे वाचवा', २५ टक्के डिस्काऊंटमध्ये जेवा, काय आहे स्कीम?

आरे जंगल वाचवण्यासाठी 'आरे वाचवा' या मोहिमेनं चांगलाच जोर धरला आहे. पर्यावरणवादी संस्था, महाविद्यालयांमधील विद्यार्थी आरे वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत. आरे वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वांद्रेतल्या २ रेस्टॉरंटनं देखील आरे मोहिमेला जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा यासाठी हटके संकल्पना राबवली आहे

२ रेस्टॉरंट्सची संकल्पना

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २७०० झाडांना तोडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं घेतला. या निर्णयाचा मुंबईकरांनी कडाडून विरोध केला. अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन आणि स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. आरे वाचवा या मोहिमेशी अधिक मुंबईकर जोडण्यासाठी वांद्रेमधल्या दोन रेस्टॉरंट्सनी वेगळीच संकल्पना राबवलीय

२५ टक्के डिस्काऊंट

वांद्रेतल्या कार्टर रोड इथल्या भाईजान्स रेस्टॉरंट आणि पाली व्हिलेज इथलं कॅफे बान्द्रा या दोन रेस्टॉरंटमध्ये बिलावर २५ टक्के डिस्काऊंट देण्यात आलं आहे. आता ही सवलत तुम्हाला अशीच मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी मदत करावी लागणार आहे. तुम्ही म्हणाल बिलावर डिस्काऊंट आणि आरेचा काय संबंध? तर आहे असं की, आरे वाचवा या मोहिमेला पाठिंबा देण्याऱ्या याचिकेवर तुम्हाला स्वाक्षरी करावी लागेल. जर तुम्ही या याचिकेवर स्वाक्षरी करत आरे मोहिमेला पाठिंबा दर्शवलात तरच तुम्हाला बिलावर २५ टक्के डिस्काऊंट मिळेल

वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती

मुंबई हायकोर्टात आरे संदर्भात झालेल्या सुनावणीत ३० सप्टेंबरपर्यंत झाडे तोडण्यास स्थगिती दिली आहे. ३ सप्टेंबरला आरे वाचवा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुंबईकर सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत श्रद्धा कपूर देखील सहभागी होती. यावेळी मुंबईकरांनी मानवी साखळी करून आरे वाचवा मोहिमेला आपलं समर्थन दर्शवलं होतं.  


पुढील बातमी
इतर बातम्या