मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्याना (SGNP)तील यश नावाच्या वाघाचा बुधवारी कर्करोगानं मृत्यू झाला. तो अकरा वर्षांचा होता. यश हा उद्यानातल्या टायगर सफारीतील एक आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. गेल्या वर्षी यशला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यशला काही वर्षांपूर्वी अॅम्ब्रिओनल (embryonal) प्रकारातील रॅब्डोमायोसार्कोमा (rhabdomyosarcoma) हा अत्यंत दुर्मिळ कर्करोग झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्याच्यावर डॉ. शैलेश पेठे यांनी २ शस्त्रक्रिया केल्या होत्या. यशला झालेल्या कर्करोगाचे नमुने विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवून त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु कर्करोगामुळे त्याच्या तब्येतीवर परिणाम झाल्याने त्याचा आहार कमी झाला होता. परिणामी त्याचं वजनही घटलं होतं.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘अॅनिमल अॅडाॅप्शन स्कीम’ अंतर्गत दत्तक घेण्यात आलेला यश हा पहिला वाघ होता. २०१४ मध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यशला दत्तक घेतलं होतं. तेव्हा यशचं वय ५ वर्षे होतं. २०१६ मध्ये दत्तक कालावधी संपल्यानंतर तो पुढे वाढवण्यात आला नाही.
काही दिवसांपूर्वीच १८ वर्षांच्या बाजीराव वाघाचं वृद्धापकाळाने निधन झालं होतं. सद्यस्थितीत या उद्यानात बसंती (१६ वर्षे), आनंद (९ वर्षे), लक्ष्मी (९ वर्षे), बिजली (९ वर्षे) आणि मस्तानी (९ वर्षे) असे ५ वाघ उरले आहेत.
हेही वाचा-
संजय गांधी उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू
आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?