घरगुती गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली, लक्षात ठेवा हे १० नियम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. मुंबईत तर कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यात गणेशोत्सव जवळ आला आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सावावर कोरोनाचं सावट असणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं घरगुती गणेश भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियमावली जाहीर केली आहे. याआधी महापालिकेनं सार्वजनिक गणेश मंडळासाठी नियमावली जाहीर केली होती.

  • घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तिंचा समूह असावा.
  • आगमनप्रसंगी मास्क/शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्यादी स्वसंरक्षणाची साधनं काटेकोरपणे वापरण्यात यावीत.
  • घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी आणि या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे / कुटुंबियांचे ‘कोविड-19’ साथ रोगापासून संरक्षण करणे शक्य होईल.
  • भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणं शक्य आहे.

हेही वाचा : सरकारच्या नियम, अटीचं पालन करत मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार : किशोरी पेडणेकर

  • गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणं शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचं विसर्जन करावं.
  • विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.
  • घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये.
  • विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्क / शिल्ड इत्या्दी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत.
  • शक्यतो लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
  • घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करावे.


हेही वाचा

केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव यंदा 'असा' होणार साजरा

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

पुढील बातमी
इतर बातम्या