दहीहंडी, गणेशोत्सवात निर्बंध लावाच, केंद्राची राज्य सरकारला सुचना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

केंद्र सरकारनं (center government) आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात (ganpati festival 2021) गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशा सुचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे या सुचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यानं केंद्रानं ही सुचना केली आहे.

राज्य शासनानं यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. आता केंद्रीय आरोग्य विभागानं देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

कोविडचा धोका अजून गेलेला नसल्यानं हे उत्सव सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात अशी भीती आयसीएमआर आणि एनसीडीसीनं यापूर्वी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असं लक्षात आलं आहे. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे असं केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रानं आणि देशानंही संसर्ग रोखण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे टेस्ट –ट्रेक-ट्रीट वर भर देणे तसंच कोविड संदर्भातील सर्व आरोग्याचे नियम याचे पालन कटाक्षानं होईल हे पाहणे गरजेचं आहे, असंही या पत्रात म्हटलं आहे.

राज्य सरकारने आधीच दहीहंडी उत्सव घेण्यास मनाई केली आहे. पण, भाजपचे आमदार राम कदम यांनी काहीही झालं तरी दहीहंडी उत्सव घेणारच अशी घोषणा केली आहे. त्यांच्यापाठोपाठ मनसेनं सुद्धा दहीहंडी उत्सव घेण्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा

'पीओपी'च्या मूर्तींचं कुठेही विसर्जन करता येणार नाही : हायकोर्ट

'इतक्याच' गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या