दहीहंडीच्या नादात 'त्यांचे' नशीबच फुटले

  • मानसी बेंडके & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

ढोल-ताशाच्या गजरात थरावर थर लावणारे गोविंदा... शिट्टीच्या आवाजात शिस्तबद्ध हालचाली... सीट डाऊन, अरे आरामसे, घाई नको... स्टेबल राहा... एकामागे एक सूचना... त्यात शेवटच्या थरावर चढणारा छोटा गोविंदा... सर्वांचे डोळे गोविंदाकडे... उपस्थितांची उत्कंठा शिगेला... थोडा जरी तोल इकडचा तिकडे झाला तरी सर्वांच्या मनात धस्स होते... दहीहंडी म्हटली की मुंबईच्या रस्त्यांवर हेच चित्र पाहायला मिळते. पण मुंबईकरांच्या जिवाभावाचा असणारा हा खेळ मुंबईत कधीपासून खेळला जाऊ लागला हे तुम्हाला माहित आहे का?

सौजन्य

मुंबईत दहीहंडीला खरी सुरुवात केली ती गिरणी कामगारांनी. मुंबई शहरात काम करून पोट भरण्यासाठी आलेल्या कोकणातील कष्टकऱ्यांनी स्वत:च्या करमणुकीसाठी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. हळूहळू दहीहंडी हा गल्लीबोळातील पोराटोरांचा गंमतीचा खेळ झाला. कधीकाळी अगदी जिवाभावाचा आणि साहसी असा हा खेळ मुंबईत खूप साध्या पद्धतीने खेळला जायचा. दोन चाळींमध्ये किंवा इमारतींमध्ये दोरखंडाच्या आधारे दहीहंडी बांधली जायची. जास्तीत जास्त ४ ते ५ थर लावून गल्लोगल्ली बांधलेल्या हंडी फोडल्या जायच्या.

कृष्णाच्या एका खोडसाळ खेळापासून सुरू झालेली ही दहीहंडी काळाच्या ओघात बदलत गेली. त्याला राजकीय स्वरूप येऊ लागले. पैशांची बोली लावली जाऊ लागली. कालांतराने बक्षिसांच्या रकमेमध्ये शून्यावर शून्य चढत गेले आणि त्यासोबतच दहीहंडीची उंचीही आकाशाला भिडत गेली. स्पॉन्सर्स, बॅनर्स, डीजेचे स्पीकर्स आणि ग्लॅमरचा तडका यामुळे तर या खेळाला इव्हेंटचे स्वरूप आले. त्यामुळे गोविंदा पथकांमधली स्पर्धा अधिक वाढली. मात्र या नादात अनेक गोविंदांनी आपला जीव गमावला. शेकडो गोविंदा जखमी झाले. काहींचे तर आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यापैकीच एक आहे विरारला राहणारे ३३ वर्षीय दयानंद भागवनकर...

२००८ साली माझ्या भावाचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या मानेच्या मणक्याला मार लागला. त्यामुळे त्याला पॅरेलिसिसचा झटका आला. चार-पाच लाख खर्च करून त्याचे ऑपरेशन झाले. मानेमध्ये प्लेट टाकण्यात आली. तेव्हापासून तो स्ट्रेचरवरच आहे. चालायचे असेल तर कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. रोज फिजीयोथेरपी करावी लागते. त्याचा खूप खर्च आहे. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने एवढा खर्च परवडत नाही. त्यामुळे सध्या त्याची फिजीयोथेरपी बंद केली आहे. आई घरकाम करते. त्यावर आमचा उदरनिर्वाह होतो.

- सागर भादवनकर, दयानंदचा भाऊ

भिवंडीत राहणारे ३० वर्षीय नागेश भोईर यांची कहाणी काही वेगळी नाही. दहीहंडीच्या नादात त्यांचे नशीबच फुटले.

२००९ साली दहीहंडी खेळताना माझा अपघात झाला. या अपघातात माझ्या मणक्याला (सर्व्हायकल स्पाईन इंज्युरी) दुखापत झाली. त्यामुळे मी गेल्या आठ वर्षांपासून जागेवरच आहे. मला उठायचे असले की मदत लागते. सुरुवातीला बसता देखील येत नव्हते. पण घरच्यांच्या प्रयत्नांमुळे यावर्षी मला बसता येऊ लागले. सध्या चालायचे प्रयत्न करतोय. आता घराची पूर्ण जबाबदारी बाबांवर आहे. ते एकटेच कमवते आहेत. त्यात माझ्या उपचारांचा खर्च.

२००९ मध्ये अपघात झाला तेव्हा मंडळाने मदत केली. तसेच नगरसेवक आमदार यांनी देखील हातभार लावला. मित्रसुद्धा आर्थिक मदत करत असतात. पण ते किती दिवस मला मदत करणार? आज कुठे तरी वाटतेय की, दहीहंडीला गेलो नसतो, तर आज माझी ही अवस्था झाली नसती. चार थरांहून अधिक थर लावले नाही पाहिजेत याची काळजी मंडळातर्फे घेतली गेली पाहिजे. आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. तेव्हाच असे अपघात टाळता येतील.

- नागेश भोईर

नागेश आणि दयानंद यांच्यासारखे अनेक गोविंदा आहेत. आज त्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. अजून कुणाचे आयुष्य उद्धवस्त होऊ नये आणि अपघातांना आळा बसावा यासाठी स्वाती पाटील लढा देत आहेत. २०१४ मध्ये दहीहंडीची उडी २० फुटांपेक्षा अधिक असू नये आणि बालगोविंदांमार्फत हंडी फोडली जाऊ नये यासाठी स्वाती यांनी याचिका दाखल केली होती. २०१४ मध्ये स्वाती यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता. त्यानंतर अपघातांच्या संख्येत प्रचंड घट झाली.

उंची कमी केल्याने तीन वर्षांमध्ये 80 टक्के अपघात कमी झाले होते. पण यावर्षी उच्च न्यायालयाने उंचीवरील मर्याद हटवली आहे. त्यामुळे यावर्षी दहीहंडी दरम्यान अपघात होण्याची टक्केवारी वाढू शकते. सरावा दरम्यान पण अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले. यासोबतच उच्च न्यायालयाने सुरक्षेच्या बाबतीत आयोजकांसाठी नियमावली बनवली आहे. ते नियम जर नाही पाळले तर आयोजकांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अनेक आयोजकांनी दहीहंडी रद्द केलेल्या आहेत. पण येत्या काळात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच अपिल करणार आहोत. 

- स्वाती पाटील, याचिकाकर्त्या

पण याविरोधात गोविंदा पथक आयोजक समिती न्यायालयात गेली. अखेर २०१७ मध्ये गोविंदा पथकांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. दहीहंडी उंचीवरील निर्बंध उच्च न्यायालयाने हटवले असून उंची किती असावी याबाबतच्या निर्णयाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या