दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; रस्त्यावर वाहनांची मोठी रांग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबईसह राज्यभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार दीपोत्सव (दिवाळी) यंदा साधेपणाने साजरा केला जाणार आहे. राज्यावर असलेल्या कोरोनाच्या सावटामुळं राज्य सरकारनं यंदा सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. मात्र असं असलं तरी दरवर्षीप्रमाणं मुंबईकरांनी दिवाळीच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

दिवाळीच्या खरेदीसाठी महात्मा फुले मंडईसह (क्रॉफर्ड मार्केट) सर्व वस्तूंच्या बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्यानं सलग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दक्षिण मुंबईत जागोजागी वाहतूक खोळंबली. क्रॉफर्ड मार्केटमधील ग्राहकांसह त्यांच्या वाहनांनी केलेल्या गर्दीचा परिणाम परळपर्यंत जाणवला. परळपासून क्रॉफर्ड मार्केटपर्यंत वाहने मुंगीच्या वेगाने पुढे सरकत होती. त्यामुळे बेस्टसह अन्य मोठ्या वाहनांना हे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तासांहून अधिक अवधी लागत होता.

दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारे सर्वच प्रमुख मार्ग तुलनेने मोकळे असतात, तर उत्तरेकडे म्हणजेच दक्षिण मुंबईतून मध्य मंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे ज्या ठिकाणी मार्ग चिंचोळे आहेत, तिथे वाहतूक तुंबते. मात्र सध्यस्थितीत वाहनांची वाहतूक मोठ्या संख्येनं वाढली.

लोकल सेवा सुरू नसल्यानं ग्राहकांनी खासगी वाहन, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवेने दक्षिण मुंबई, दादरसह स्थानिक बाजारपेठा गाठल्या. त्यामुळे या तीन दिवसांत दक्षिण मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांसोबत दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. त्यातच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी वाहनतळ उपलब्ध नसल्याने रस्त्याकडेला उभी केली. त्याचाही परिणाम वाहतुकीवर झाला. परिणामी दक्षिण मुंबईत वाहतुकीचे नियमन करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या