मोड आलेली मटकी... लालबुंद रस्स्याचा तवंग मिरवणारी खमंग तर्री... त्यावर फरसाण आणि ऐसपैस ट्रेच्या प्लेटमध्ये जिभेला खुणावणारे मिश्रण म्हणजेच कांदा, कोथिंबीर आणि पावाची लुसलुशीत लादी...आहाहा... तरतरी आणणारी झणझणीत आणि घाम फोडणारी चवदार मिसळ! कोणत्याही सुग्रास भोजनाएवढाच तिचा ऐटदार थाट असतो! तिचा हा थाट पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल!
महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, पण मिसळची चव न चाखलेला माणूस महाराष्ट्रात आढळणं फार कठीण आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि जागोजागच्या मिसळ परंपरांनी खवय्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण खास करून फक्त मिसळ खाण्यासाठी पुणे, कोल्हापूर, लोणावळा गाठणं प्रत्येकालाच शक्य नसतं. मग अशा खवय्यांसाठी दादरमध्ये 'द हाऊस ऑफ मिसळ' नावाचं आऊटलेट सुरू झालं आहे. जिथे फक्त आणि फक्त मिसळ मिळतात.
'द हाऊस ऑफ मिसळ' या आऊटलेटमध्ये एक-दोन नाही तर चक्क १८ प्रकारच्या मिसळचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक, मुंबई, मालवणी अशा नेहमी खाल्लेल्या मिसळ इथं उपलब्ध आहेतच. पण त्याशिवाय दही मिसळ, वऱ्हाडी मिसळ, पोहे मिसळ, पाणी-पुरी मिसळ, मिसळ शेजवानी, मिसळ पेरी-पेरी तंदुरी मिसळ, समोसा मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या १८ मिसळ इथं उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या इथं मिळणारा पाव देखील बाजारात मिळणाऱ्या पावासारखा नाही. द हाऊस ऑफ मिसळचे मालक गौरव पवार आणि त्यांच्या आई श्रद्धा पवार हे पाव स्पेशली बनवून घेतात.
'दही मिसळ' बद्दल सांगायचं झालं तर, मिसळमध्ये आपण दही मिसळण्याचा विचार आपण कधीच केला नसेल. पण 'द हाऊस ऑफ मिसळ'नं हे करून दाखवलं आहे. झणझणीत मिसळमध्ये दही मिक्स केल्यानं थोडंस तिखट आणि आंबट असा स्वाद येतो. 'वऱ्हाडी मिसळ' म्हणजे अस्सल, पारंपारिक विदर्भातील मसाले वापरून तयार केलेली झक्कास मिसळ. भरपूर मटकी, शेव कोथींबीरनं भरलेली अशी वऱ्हाडी मिसळ आणि त्याच्या सोबतीला मऊमऊ पाव.
फक्त एवढंच नाही तर तुम्हाला इथं 'उपवास मिसळ' देखील मिळेल. उपवासाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आणि गुरुवारी उपवासाची मिसळ चाखता येणार आहे.
१८ प्रकारच्या मिसळ बनवण्यात हात आहे तो श्रद्धा पवार यांचा. भायखाळा इथं राहणाऱ्या श्रद्धा यांनी ३० वर्ष पालिकेत काम केलं. जॉब सांभाळत त्यांनी त्यांच्यातील कलागुणांना देखीव वाव दिला. वेगवेगळे पदार्थ बनवणं, काही तरी हटके बनवणं ही आवड त्यांनी जपली. यातूनच त्यांचा मुलगा गौरव पवार यांना आईसोबत हाऊस ऑफ मिसळची संकल्पना सुचली. आज जवळपास १८ प्रकारच्या मिसळ त्या स्वत: बनवतात. फक्त मिसळच नाही तर त्यांचे मसाले देखील त्या घरीच बनवतात. दादरजवळील प्लाजा इथं सकाळी पाच वाजता येऊन त्यांची तयारी सुरू होते. सकाळी ७ वाजता सुरू झालेले मिसळ हाऊस रात्री १० पर्यंत खुलं असतं.
मिसळ ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण आजच्या बदलत्या काळानुसार त्यात बदल न झाल्यानं ती थोडी मागे पडत चालली आहे. बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी, चायनीज या पदार्थांची तरूणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. जर हीच चव आपण मिसळमध्ये उतरवली तर तरूणांना नक्कीच आवडेल. मिसळची पारंपारिक पद्धत जपत आम्ही त्यात हे बदल केले आहेत.
गौरव पवार, मालक
येत्या काळात गौरव आणि त्यांच्या आई आणखी काही वेगळ्या प्रकारच्या मिसळ खवय्यांसाठी घेऊन येणार आहेत. पिझ्झा फ्लेवर मिसळ, पास्ता फ्लेवर मिसळ आणि मंगळोरी मिसळ अशा काही हटके मिसळ चाखण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे.
'द हाऊस ऑफ मिसळ' मुळे मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मिसळींची चव एकाच छताखाली चाखण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही देखील इथल्या वेगवेगळ्या मिसळ नक्की ट्राय करा.
पत्ता : द हाऊस ऑफ मिसळ, प्लाजा थिएटरजवळ, दादर (प.)
संपर्क : 093721 66413
हेही वाचा -