बाराखडी सर्वांच्याच लक्षात असेल? बाराखडीमुळेच तर लहान असताना अक्षरांची ओळख होते. ए फॉर अॅपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट हे इंग्रजीत तर अ से अनार, ब से बटन हे आपल्या सर्वांनाच लहान असताना शिकवलं आहे. पण खवय्यांची बाराखडी मात्र जरा वेगळी आहे. खवय्यांची बाराखडी सुरू होते ती म्हणजे फ या अक्षरापासून. खवय्यांच्या भाषेत फ म्हणजे फूड असा होता. आता खवय्यांची हीच आवड ओळखून मुलुंडमध्ये 'फ से फूड' अशा नावाचं रेस्टॉरंट सुरू झालंय. नावाप्रमाणेच इथले पदार्थ आणि त्यांना सर्व्ह करण्याची पद्धत ही हटके आहे. त्यामुळे सध्या हे रेस्टॉरंट खवय्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे.
'फ से फूड'मधला प्रत्येक पदार्थ हा हटके तर आहेच. त्यासोबतच एखादा पदार्थ सर्व्ह करण्याची पद्धत देखील हटके आहे. स्टार्टर म्हणून तुम्ही 'बाकरवडी चकली चाट' ऑर्डर करू शकता. नाव वाचूनच तुम्हाला हा प्रकार वेगळा असल्याचं तुम्हाला कळालच असेल. बाकरवड्या आणि चकल्यांबरोबर फरसाण, कांदा, टोमेटो टाकून केलेला एक कुरकुरीत चाट आयटम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाकरवडी चकली चाट सर्व्ह करण्याची पद्धत. एखाद्या साध्या-सुध्या डिशमध्ये सर्व्ह न करता खेळण्यातल्या एका हातगाडीवर बाकरवडी चकली चाट सर्व्ह केला जातो.
भरपूर चीजनं सजवलेली शेवपुरी देखील तुम्ही नक्की ट्राय करा. याशिवाय 'खिचिया पापड विथ चीज पास्ता', 'छोले-भटुरे बॉम्ब' या हटके पदार्थांची चव तर नक्कीच चाखा. मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये मिळणारा खिचिया पापड प्रत्येकानं खाल्लाच असेल. पण 'फ से फूड'मधल्या खिचा पापडची बातच काही और आहे. कारण पापडावर फरसाण आणि मसाल्याऐवजी चीज पास्ता सर्व्ह करून दिला जातो.
पावभाजीचे वेगवेगळ्या प्रकारांसाठी हे रेस्टॉरंट ओळखलं जातं. पावभाजी फॉन्द्यू नावाचा एक भन्नाट प्रकार इथं मिळतो. फॉन्द्यू पावभाजी म्हणजे स्टीकला पाव टोचून भाजीत बुडवून खाल्ले जातात. याशिवाय पावभाजी टार्ट या प्रकारच्या पावभाजीला फ से फूडमध्ये अधिक पसंती दिली जाते. मोठ्या आकाराचे टार्ट पाव भाजीच्या भाजीनं भरलेले असतात आणि त्यावर चीज... आहाहा... तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल. पण थांबा, हे तर काहीच नाही.
आता हा पावभाजीचा डोस काही कमी होता की काय इथं पावभाजी पिझ्झा देखील सर्व्ह केला जातो. मॅक्सिकन आणि इटालियन प्रकारचे अनेक पिझ्झा इथं मिळतात. पण पावभाजी पिझ्झा खवय्यांच्या अधिक पसंतीस उतरतो. याशिवाय तुम्ही चीज खाण्याचे शौकिन असाल तर फोर चीज पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकता. या पिझ्झामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे चीज असते.
आता एवढं खाणं झाल्यावर पचवायला काहीतरी पाहिजेच ना. मग छास प्लेटर तुम्ही ट्राय करू शकता. यात चार प्रकारचे छास येतात. मसाला छास, बीट फ्लेवरचं छास, पेरु फ्लेवर आणि पालक फ्लेवर छास असे चार हटके फ्लेवर तुम्ही ट्राय करू शकता.
आता चटपटीत आणि झणझणीत वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यावर काही तरी गोड झालच पाहिजे. मग इथं तुम्हाला बुंदीच्या लाडूचं आईस्क्रिम, पॉर्पकॉन आईस्क्रिम, किवी फ्लेवर्सचा रसगुल्ला, चॉकलेट मूस असे भन्नाट पदार्थ असतात. पण इथला डिझर्टचा मेन्यू नेहमी बदलतो.
कुठे : फ से फूड, पहिला मजला, गॅलेरिया बिल्डिंग, फोर्टिस हॉस्पीटलजवळ, मुलुंड
हेही वाचा