केईएममध्ये स्लॅब कोसळून तीन कामगार जखमी

परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात स्लॅब कोसळून तीन कामगार जखमी झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयाची दुरवस्था

प्रशांत घाडीगावकर (४०), प्रवीण परमार (४२) आणि अनिल हरिजन (२९) अशी या तीन कर्मचाऱ्यांची नावं असून सकाळी सात ते तीनची पहिली शिफ्ट संपवून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. हे तिन्ही कर्मचारी केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर वॉर्ड क्रमांक चारजवळील लिफ्टजवळ उभे होते. त्यावेळी अचानक लिफ्ट नजीकचं प्लास्टर त्यांच्यावर कोसळलं. दरम्यान त्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयातच दाखल करण्यात आलं असून या दुर्घटनेमुळे पालिका रुग्णालयाची दुरवस्था झाल्याचं दिसून येत आहे.

परळ येथील केएईम रुग्णालयात लालबाग, दादर यांसह इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येन रुग्ण उपचारासाठी येत असतात. मागील काही वर्षांपासून या रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून अशाप्रकारच्या घटनांमुळे रुग्णालयतील रुग्णासह कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.

या अपघातात तिन्ही कामगारांचे सिटीस्कॅन करण्यात आलं आहे. यातील प्रशांत घाडीगावकर यांच्या डोक्‍याला दुखापत झाली असून, त्यांना सहा टाके पडले आहेत. प्रवीण परमार आणि अनिल हरीजन यांना मुका मार लागला आहे. सध्या या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

पुढील बातमी
इतर बातम्या