ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात वाढ, ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचा निषेध

ऑक्सिजन सिलेंडरची विक्री महागली असताना आता ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात देखील तिप्पटीनं वाढ झाली आहे. रुग्णांची ही लूट थांबवण्यासाठी आता ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशननं पुढाकार घेतला आहे. याप्रकरणी असोसिएशननं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली आहे.

ऑक्सिजन मशीन आणि सिलेंडरची विक्री तसंच या वस्तू भाड्यानं देणाऱ्या व्यवसायिकांनी ऑक्सिजन मशीनच्या किंमती तब्बल २५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. सध्या कोरोना निगेटिव्ह होऊन गेलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच ऑक्सिजन घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेकजण ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन मशीन विकत घेत आहेत. याचाच गैरफायदा उठवण्याचं काम व्यावसायिकांनी केला आहे.

ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे म्हणाले की, सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्यात अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांची लूट होणार असेल तर नक्कीच हे निषेधार्ह आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.

महिनाभरापूर्वी सिलेंडर ५०० रुपयांमध्ये उपलब्ध होत होता. आता मात्र यामध्ये २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकिची आहे त्यांच्यासाठी तर हा जास्तीचा आर्थिक भुर्दंड आहे. त्यामुळे गरजू कोरोना रुग्णांसाठी सरकारनं ऑक्सिजन सिलिंडरच्या वाढत्या किंमतीवर अंकुश लावणं आवश्यक आहे. जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना योग्य दरात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध व्हावी.


हेही वाचा

COVID केअर सेंटरमधील प्रलंबित कामं ७ दिवसात पूर्ण करा : राजेश टोपे

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

पुढील बातमी
इतर बातम्या