एचआयव्हीशी लढा देणाऱ्यांसाठी 'आनंद मेळा'

एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाल्याचं कळताच कुटुंबियांपासून ते सर्वच जण त्या व्यक्तीपासून दुरावतात. अशावेळी, आधाराची गरज असते. याच पार्श्वभूमीवर अशा आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांना काही क्षण आनंदात घालवता यावे म्हणून 'आनंद मेळा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

रुग्णांसाठी या गोष्टी

या कार्यक्रमात रुग्णांसाठी मॅजिक शो, विविध खेळ, स्पर्धा आणि ऐतिहासिक शिल्पाची माहिती करून देण्यासाठी एक छोटसं म्युझियम बनवण्यात आलं होतं. शिवाय, एचआयव्ही झालेल्या लहान मुलांनी आपली कहाणी या निमित्ताने सर्वांसमोर मांडली. 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने या 'आंनद मेळा'चं आयोजन वडाळ्यात करण्यात आलं होतं.

राज्यात एचआयव्हीचा पहिला रुग्ण मे 1986 मध्ये आढळून आला. पूर्वी या आजाराबाबत लोकांना माहिती नसल्यानं अनेक गैरसमजुती होत्या. त्यानंतर करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे गेल्या सहा वर्षांत मुंबईसह महाराष्ट्रात एड्स रुग्णांच्या संख्येत 56 टक्क्यांनी घट झाली आहे.

- डॉ. श्रीकला आचार्य, अॅडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध सोसायटी

शिवाय, देहविक्री करणाऱ्या महिलांमध्येही एचआयव्ही लागणचं प्रमाण कमी झालं आहे. या महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांच्या भागातच नवीन एआरटी केंद्र सुरू करण्यात आलं असून आतापर्यंत पाच महिलांची तपासणी करण्यात आली आहे. विविध सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांशी करार करून या आजाराच्या रुग्णांची संख्या शून्यावर कशी आणता येईल, याबाबत आम्ही प्रयत्नशील असल्याचंही डॉ. आचार्य यांनी सांगितलं. राज्य जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अमेरिकेच्या राजदूत मार्क ग्रीन यांची प्रमुख उपस्थिती होती.

एड्स हा संपूर्ण जगासमोर पडलेला प्रश्न होता. पण, समाजात निर्माण करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये कमालीची घट नोंदवली जात आहे. पण, अजूनही हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी काय करावं लागेल याबाबत आम्ही विचार करतोय.

- मार्क ग्रीन, अमेरिकन राजदूत

1992 पासून पालिकेद्वारे एड्सबाबत लोकांमध्ये जागरुकता केली जात आहे. एड्सग्रस्तांना शोधून उपचार देण्यासाठी पालिका रुग्णालयात शक्ती क्लिनिक सुरू करण्यात आले. मुंबईत एकूण 16 एआरटी केंद्र आहेत. यामुळे गर्भवती मातांपासून बाळांना होणाऱ्या एचआयव्हीचं प्रमाणही 4 टक्क्यांवर आलं असल्याचं मुंबई महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं.

एचआयव्ही रुग्णांचा सीडी 4 लेवल उत्तम असणं गरजेचं असतं. पण त्यापेक्षाही या लोकांमध्ये आत्मविश्वासासह आजाराशी लढण्याची ताकद असली पाहिजे. ही ताकद समाजातून मिळते. त्यामुळे अशा व्यक्तींना लोकांनी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं पालिकेच्या तिन्ही रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या