कोरोना रुग्ण आढळला तरी रुग्णालय बंद नाही, पालिकेचा निर्णय

मुंबईतील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर ही रूग्णालये बंद करण्यात आली होती. मात्र, आता खासगी रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णालय पूर्णपणे बंद न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

मुंबईतील ब्रीच कॅण्डी, वोक्हार्ट, हिंदुजा, जसलोक आदींसह अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण किंवा कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर या रुग्णालयांमधील संपूर्ण सेवा बंद केल्या होत्या. रुग्णालय सील केल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठा वाढत आहे. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांचंही हाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं दिसून आलं. यामुळे मुंबई महापालिकेने नियमावलीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, रुग्णालयात एखाद्या रुग्णाला किंवा कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास संपूर्ण रुग्णालय बंद करण्याऐवजी त्या व्यक्तीचा संपर्क आलेला विभाग बंद करून त्याचं निर्जंतुकीकरण केलं जाईल. तसंच रुग्णालयात रुग्ण, नातेवाईक यांसह कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर प्रथम त्यांची कोरोनाची पूर्वचाचणी करावी, अशा काही सूचनाही रुग्णालयांना देण्यात येणार आहेत.

वोक्हार्ट रुग्णालयात दोन आठवडय़ांपूर्वी तीन डॉक्टरांसह ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा नव्याने २६ कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. निर्जंतुकीकरण करून हे रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णसेवा बंद केलेल्या खासगी रुग्णालयांना सेवा पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणीनंतर लवकरच ही रुग्णालये खुली करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.


हेही वाचा -

पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२०० वर


पुढील बातमी
इतर बातम्या