त्याच्या 'दिल'दारपणाने मिळाले दोघांना जीवनदान

संपूर्ण आयुष्य इतरांसाठी खर्ची घालूनही अनेकांना जे शक्य होत नाही, असे कार्य काहीजण मृत्यूला कवटाळताना करतात. चंदीगढच्या एका 40 वर्षीय 'ब्रेनडेड' दात्याच्या 'दिल'दारपणामुळे मुंबईतील दोघांना जीवनदान मिळाले, हे याचे उत्तम उदाहरण.

चंदीगढची एक 40 वर्षीय व्यक्ती 'ब्रेनडेड' झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात अाले. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदानाची तयारी दाखवल्यानंतर डॉक्टरांपुढील आव्हानाला सुरूवात झाली.

मुलुंड येथील खासगी रुग्णालयात एक 43 वर्षीय रुग्ण गेल्या 37 दिवसांपासून हृदयाच्या प्रतिक्षेत होता. या रुग्णाला डायलेटेड कार्डिओमयोपथी (हृदय मोठे होणे) आजार असल्याचे निदान करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यानुसार मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रियेची सर्व तयारी करण्यात आली. त्यानंतर चंदीगढ येथील पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथून सकाळी 11 वाजून 2 मिनिटांनी डॉक्टरांचा चमू हृदय घेऊन निघाला. 1 वाजून 15 मिनिटांनी हा चमू मुंबईत दाखल झाला. चंदीगढहून विमानाद्वारे 2 तास 38 मिनिटांत हे हृदय मुंबईत दाखल झाले. या दानशूर व्यक्तीने हृदयासह फुफ्फुस, डोळे, यकृत, मूत्रपिंडही दान केल्याने हे सर्व अवयवही या विमानातून मुंबईत आणण्यात आले. हृदय रुग्णालयात दाखल होताच या रुग्णावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यापाठोपाठ इंदूरच्या एका 55 वर्षीय महिलेला फुफ्फुसाची गरज होती. तिला या व्यक्तीचे फुफ्फुस दान करण्यात आले. या महिलेला फुप्फुसांचा विकार झाला होता. त्या दोन आठवड्यांपासून मृत्यूशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या व्यक्तीचे डोळे नेत्रपिढीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया चमूचे प्रमुख डॉ. अन्वय मुळे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या