पालिका रुग्णालयांमध्ये 'ट्रनट'; कोरोना व क्षयरोगाच्या चाचण्या करणं होणार सोपं

मुंबई महापालिकेच्या काही रुग्णालयात 'ट्रनट' यंत्र बसवण्यात येणार आहे. 'फाऊंडेशन फॉर इनोव्हेटिव न्यू डायग्नोस्टिक्स' (फाइण्ड) आणि 'टाटा ट्रस्ट्स' यांच्यामार्फत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे कोरोना व क्षयरोग या आजारांच्या चाचण्या करता येणार आहेत. 'ट्रनट' हे यंत्र गोव्याच्या 'मोल्बिओ डायग्नोस्टिक्स'नं विकसित केलं आहे. कोरोना आणि क्षयरोग हे श्वसनातील हवा आणि थेंबांद्वारे पसरणारे आजार आहेत.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांची क्षयरोगासाठी आणि क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी ट्रनटद्वारे शक्य होणार आहे. या यंत्रात एक चिप बसवण्यात आली आहे. यात चाचणी के ल्यानंतर ६० मिनिटांपेक्षा कमी वेळेत अहवाल प्राप्त होतो.

या प्रक्रियेत 'रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन' (आरटीपीसीआर) चाचणीचा वापर केला जातो. जलद प्रतिजन चाचण्यांमध्ये अबाधित आढळलेल्या रुग्णांची ट्रनटमध्ये चाचणी करण्यात येणार आहे. निवडण्यात आलेल्या प्रत्येक महापालिका रुग्णालयात ट्रनट यंत्र, आवश्यक प्रयोगशाळा कर्मचारी, चाचणी साहित्य, इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


हेही वाचा -

महापौरांचा लोकल प्रवास, हात जोडून केली मास्क घालण्याची विनंती

मुंबईतील चार वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने


पुढील बातमी
इतर बातम्या