परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत ३ जूनला आणखी एक लसीकरण सत्र

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचं (student) कोविड लसीकरण झालेलं असणं अनिवार्य आहे. लसीकरणाअभावी अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांची  शैक्षणिक संधी वाया जाऊ नये यासाठी नवी मुंबई  महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता विशेष लसीकरण सत्राचं (special corona vaccination session) आयोजन करण्यात आलं होतं.

मंगळवारी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत असलेल्या लसीकरण सत्राचा लाभ घेण्यासाठी सेक्टर १५ नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात सकाळपासूनच परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती. दिवसभरात १४३ युवक व १०९ युवती अशा २५२ विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अजूनही काही विद्यार्थी माहिती न मिळाल्याने अथवा अन्य काही कारणामुळे या लसीकरण सत्रास येऊ शकले नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी गुरूवार ३ जून २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत सेक्टर १५ नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात हे विशेष लसीकरण सत्र होणार आहे. 

१८ ते ४४ वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे त्यांनी या विशेष लसीकरण सत्रात येऊन लसीकरण करून घ्यावे असं आवाहन नवी मुंबई महापालिकेने केलं आहे. 

लसीकरणासाठी येताना सोबत आवश्यक वैध पुरावे म्हणजेच परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा आणि सदर व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS -160 फॉर्म इ. कागदपत्रे सोबत आणणं बंधनकारक आहे.



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

नवी मुंबईत आता रुग्णालयांमध्येच डिस्चार्जपूर्वी होणार बिलांची तपासणी

पुढील बातमी
इतर बातम्या