Coronavirus update: देशातील प्रत्येक दुसरा कोरोनाबळी महाराष्ट्रात

महाराष्ट्रातील कोरोना (Coronavirus) संकट दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. एका बाजूला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांवर जाऊन पोहोचलेला असताना महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्याही अडीच हजारांच्या जवळ येऊन पोहोचली आहे. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर देखील सर्वांना चिंतेत टाकणार आहे. देशातील प्रत्येक दुसरा बळी हा महाराष्ट्रात (maharashtra) होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य सरकारने २ समित्यांची स्थापना केली आहे.

असा आहे मृत्यूदर

महाराष्ट्रात आणि देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसंच कोरोनाचे (corona patient) देशभरात १०८१५ रुग्ण आढळले असून आतापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात २४५५ रुग्ण आढळले असून १६० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातही १६० पैकी १०१ मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. त्यादृष्टीने बघायला गेल्यास देशातील प्रत्येक दुसरा कोरोनाबळी हा महाराष्ट्रातच जात आहे. देशातील मृत्यूदर ३ टक्क्यांवर असला, तरी महाराष्ट्रात हाच मृत्यूदर ६ ते ७ टक्क्यांवर गेला आहे. 

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग काय? निलेश राणे यांचा सवाल

तज्ज्ञांची समिती

परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राज्य सरकारने कोरोनामुळे (covid-19) राज्यात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं विश्लेषण करण्यासह त्याचं प्रमाण कमी करण्याकरीता आरोग्य विभागाकडून मुंबई व परिसर आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांच्या दोन समित्या स्थापन केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली. 

मुंबईसाठी असलेल्या समितीमध्ये अध्यक्षपदी के.ई.एम.चे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे. सदस्य म्हणून के.ई.एम.चे डॉ. मिलिंद नाडकर, सायनचे डॉ. नितीन कर्णीक, जे.जे. रुग्णालयाचे प्रा.डॉ. छाया राजगुरू व डॉ. विद्या नागर, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांचा समावेश असेल.

तर उर्वरित राज्याच्या समितीत आरोग्य संचालक हे समितीचे अध्यक्ष. माजी आरोग्य संचालक डॉ. पी.पी. डोके, निवृत्त प्राध्यापक डॉ. ए.एल. काकराणी व डॉ. दिलीप कदम, बी.जे. महाविद्यालयाचे डॉ. शशीकला सांगळे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा- कोरोना लढ्यासाठी मुंबईतील ९ नामवंत डाॅक्टरांची टास्क फोर्स

पुढील बातमी
इतर बातम्या