ठाण्यातही उभारणार १ हजार खाटांचं कोविड १९ रुग्णालय

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात येत असलेल्या कोविड-१९ हॉस्पिटलप्रमाणे ठाण्यात देखील १००० खाटांचं स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. 

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात १००० खाटांचे कोविड-१९ हाॅस्पिटल युद्धपातळीवर उभारण्यात येत आहे. सदर रुग्णालय ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरसह सर्व यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. येणाऱ्या १५ दिवसांत युद्धपातळीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याच पद्धतीने ठाण्यात देखील कोविड-१९ रुग्णालय उभारण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. 

हेही वाचा - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला पालिकेत नोकरी

कोरोनाबाधितांची वाढती संख्या 

महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच ठाण्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या स्थानिक प्रशासनाची चिंता वाढवत आहे. शहरात सद्यस्थितीत ५७८ रुण असून जवळच्याच कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या २२८ वर जाऊन पोहोचली आहे. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येकडे पाहता ठाण्यात देखील केवळ कोविड १९ साठी वेगळं रुग्णालयं हवं असं प्रशासनाला वाटू लागलं आहे.

त्यानुसार मुंबईतील बीकेसीत उभारण्यात येत असलेल्या कोविड-१९ हॉस्पिटलप्रमाणे ठाण्यात देखील १००० खाटांचे स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याबाबत ठाणे महापालिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी पुढील ३ आठवड्यात सर्व सुविधांनी सुसज्ज कोविड १९ उभारण्याबाबत चर्चा करून निर्देश दिले.  

ग्लोबल हबचं रुपांतर रुग्णालयात

करोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात १००० बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. 

त्याप्रमाणे, या ठिकाणी ५०० बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, ५०० बेड विना ऑक्सिजन, तसंच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.

हेही वाचा - मेट्रो कामांना अटींसह परवानगी
पुढील बातमी
इतर बातम्या