देशातील पहिला कोविड केअर आश्रम मुंबईत

मुंबईत देशातील पहिला कोविड केअर आश्रम उभारण्यात आला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने ७० खाटांचा हा आश्रम मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या परिसरात २ एकरात बांधला आहे. कोरोना रुग्णांवर औषधांबरोबरच योग साधनेच्या माध्यमातून या आश्रमात उपचार केले जात आहेत. आश्रमात योगासनांसाठी विशेष हॉलही तयार केला आहे. 

या कोविड केअर आश्रमात योग, ध्यान, प्रवचन, नामस्मरण या उपायांनी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आश्रमात ५० वर्षांखालील कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. असं मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितलं. रुग्णांना रोज एक तास योग, ९० मिनिटे ध्यान करावे लागणार आहे. तसंच रोज अर्धा तास अध्यात्मिक चर्चा करण्यात येणार आहेत.

आश्रमातील सर्व खोल्यामध्ये सुर्याचा प्रकाश योग्य येईल अशी व्यवस्था केली असून प्रत्येक रुग्णांसाठी बेड, खुर्ची आणि पंखा याची व्यवस्था केली गेली आहे.तसंच व्हिडिओच्या माध्यमातूनही योगा शिकवण्याची व्यवस्था केली आहे. व्हिडिओ आणि ऑनलाइन पद्धतीनं रुग्णांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे.

मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयांवरही भार वाढत चालला आहे. तो भार कमी करण्यासाठी या आश्रमाची उभारणी केली आहे. योग, काढा आणि ध्यान याबरोबरच कोरोना रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या आश्रमात प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच, आश्रमात कोरोना रुग्णांना त्यांनी घरून आणलेले कपडे वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या