विलगीकरणातील चार प्रवासी हॉटेलमधून पळाले

परदेशातून आल्यानंतर विलगीकरणात ठेवलेल्या चार प्रवाशांनी हाॅटेलमधून पलायन केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकाराबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.त्यांनी हॉटेल मालक व प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

सांताक्रूझ पूर्व येथील हॉटेल साई इनमध्ये आखाती व इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणासाठी सांताक्रूझ पूर्वमधील हॉटेल साई इनमध्ये ठेवले जाते. महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी बुधवारी अचानक या हॉटेलची पाहणी केली. यावेळी हॉटेलमधून चार प्रवासी पळून गेल्याचं निदर्शनास आलं. 

कुठल्याही परिस्थितीत या चार प्रवाशांना शोधून त्यांचे विलगीकरण करणे अत्यावश्यक असून त्यांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. अन्य देशांमध्ये कोरोनाची स्थिती भयंकर असून त्यानंतरही प्रवासी अशा प्रकारे वागत असतील आणि हॉटेलमालक त्यांना सहकार्य करत असेल तर ही चिंतेची बाब आहे. याबाबत पालिका आयुक्तांना माहिती देऊन सर्व हॉटेल मालकांना सक्त ताकीद देण्याचे निर्देश देणार असल्याचं महापौरांनी सांगितलं.

याबबात महापौर म्हणाल्या की, पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी हॉटेल मालकावर असते. घडलेल्या प्रकाराबाबत हॉटेल मालकाने संबंधित पोलिस ठाणे व पालिकेला कळविणे गरजेचे होते, परंतु त्यांनी कुणालाही कळविले नाही. या प्रकारचे धाडस कोणीही करू नये, यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 


हेही वाचा -

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत


पुढील बातमी
इतर बातम्या