जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर

राज्यभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली आहे. कोरोनाच्या कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ही लस दिली जात आहे. असं असलं तरी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात लसीच्या सुरक्षिततेविषयी मोठ्या प्रमाणावर साशंकता असल्याची उदाहरणे दररोज समोर येत आहेत. विशेषत: ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोव्हॅक्सीन लस घेण्यास नकार दिला जात आहे.

मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र आहे. मंगळवारी याठिकाणी १०० जणांना लस दिली जाणे अपेक्षित होते. मात्र, यापैकी केवळ १३ आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आले. तेदेखील रुग्णालयातील कर्मचारीच होते.

जे.जे. समूहातील सुमारे ७७५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मात्र, याठिकाणी कोव्हॅक्सीन लस मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी लस घेण्यास तितकेसे उत्सुक नाहीत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेत लस टोचून घेतल्यामुळे लसीकरणाचा आकडा कसाबसा ३९ पर्यंत पोहोचला. मात्र, मंगळवारी लसीकरणासाठी नोंदणी झालेले अनेकजण रुग्णालयात फिरकलेच नाहीत.

जे.जे. रुग्णालयात कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोणताही त्रास जाणवलेला नाही. त्यामुळे आगामी काळात कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी अधिकाअधिक कर्मचारी तयार होतील, अशी आशा आहे. औरंगाबादेत ९० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीची रिअ‍ॅक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील ३५२ स्वयंसेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती. 

पुढील बातमी
इतर बातम्या