अत्यवस्थ रुग्णांना घरपोच मिळणार ऑक्सिजन

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांनी रुग्णवाहिका मिळत नाही, तर कधी खाटा उपलब्ध नसतात. त्यामुळे कोरोना रुग्ण घरीच अत्यवस्थ झाल्याच्या घटनाही घडतात. अशा अत्यवस्थ रुग्णांना प्रथमोपचार म्हणून आता प्राणवायूचा पुरवठा करणारे यंत्र के पूर्व विभाग कार्यालयाने तैनात ठेवलं आहे.

प्राणवायूची पातळी कमी होत गेल्यामुळे अत्यवस्थ झालेल्या कोरोना रुग्णांसाठी दुचाकीवरून हे आॅक्सिजन रुग्णाच्या घरापर्यंत नेता येणार आहे.  या यंत्रांमुळे अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या के पूर्व विभागातील विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व या भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या भागातील रुग्णांची संख्या आता 1340 झाली आहे. येथील 70 टक्के भाग झोपडपट्टी आहे.  विमानतळ आणि रुग्णालयात काम करणारा बराचसा कर्मचारी वर्ग हा याच भागात राहतो.

एखादा रुग्ण बाधित झाला की साधारणत: ते प्रथम नगरसेवकांकडे मदत मागतात. त्यामुळे के पूर्व विभागातील १५ नगरसेवकांना हे यंत्र देण्यात आले आहे. रुग्णवाहिका व खाट उपलब्ध होईपर्यंत रुग्ण घाबरून अत्यवस्थ होतात, तसंच कोरोना रुग्णांमध्ये प्राणवायूची पातळी झपाट्याने खाली जाते. अशा रुग्णांना या यंत्रामुळे मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पालिकेच्या विभाग कार्यालयातही दोन यंत्रे ठेवण्यात आली असून एखाद्या रुग्णाला गरज भासल्यास आरोग्य कर्मचाऱ्याबरोबर दुचाकीवरून हे यंत्र घरी पाठवून त्याला प्राणवायूचा उपचार देता येणार आहे. 

 हे यंत्र विजेवर चालणारे असून ते हवेतून ऑक्सिजनचा पुरवठा करते. हवेतील नायट्रोजन किंवा अन्य विषारी वायू वगळून केवळ ऑक्सिजनचा सलग पुरवठा यामुळे होतो. या यंत्राला एक रबरी नळी जोडून ती रुग्णाच्या नाकाला लावली जाते. प्रत्येक रुग्णासाठी नवीन रबरी नळी पुरवली जाते. हे यंत्र सहज उचलता येईल असे आहे. 


हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णालयाची मागणी

राज्यात १ व २ जूनला राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस


पुढील बातमी
इतर बातम्या