औषधांच्या पाकिटांवर धोक्याचा इशारा, १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

झोपेच्या गोळ्या, स्टेरॉईड क्रिम आणि इतर कोणतीही औषधं विकत घेताना यापुढे सावधानता बाळगावी लागणार आहे. कारण येत्या १ नोव्हेंबरपासून औषधांच्या पाकिटावर तसा धोक्याचा इशारा देणारी सूचनाच छापण्यात येणार आहे. होय असा निर्णयच केंद्र सरकारने घेतला आहे. याशिवाय, कोण-कोणत्या औषधांची पाकिटं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची हेदेखील त्यावर छापण्यात येणार आहे.

असा असेल धोक्याचा इशारा

हा धोक्याच्या इशारा लाल रंगाच्या चौकटीत काळ्या ठळक अक्षराने लिहिलं जाणार आहे. शिवाय सर्व औषधं बनवणाऱ्या कंपन्याना हा नियम येत्या १ नोव्हेंबरपासून पाळावा लागणार आहे.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने याबाबत केमिस्ट, फार्मा कंपन्या आणि इतरांकडून सूचना मागवल्या होत्या. २६ एप्रिलला केंद्राने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे.

या औषधांच्या पाकिटांवर सूचना

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शेड्युल-जी, शेड्युल-एच1, शेड्युल-एक्स या औषधांवर खास सूचना छापावी लागणार असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. शिवाय, औषध कंपन्यांना ही सूचना लाल रंगाच्या चौकटीत काळ्या ठळक अक्षरात छापणं बंधनकारक असणार आहे.

याशिवाय एनालजेसिक, हिप्नोटीक्स, सेडेटिव्ह, ट्रांक्विलायझर, हार्मोन, कॅन्सरविरोधी औषधांवरही केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे सूचना छापाव्या लागतील.

केंद्र सरकारच्या या आदेशानंतर आता झोपेच्या गोळ्या आणि स्टेरॉईड क्रिमच्या पाकिटांवर ‘हे अतिसंवेदनशील औषध असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय घेऊ नये, असा संदेश छापण्यात येणार आहे. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच क्रिम लावावी, असा इशारा पाकिटावर छापण्यात येणार असल्यानं ग्राहकांमध्ये जागरुकता वाढण्यास मदत होईल.

- कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्स फार्मासिस्ट असोसिएशन


हेही वाचा - 

आॅनलाईन फार्मसीचा मार्ग मोकळा, अंतिम आराखड्याला मंजुरीची प्रतिक्षा

साथीरोग नियंत्रण कक्षासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या