कामा हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी २४ तास मोफत सोनोग्राफी सुविधा

गर्भवती महिलांना काही ठराविक महिन्यांमध्ये सोनोग्राफी करावी लागते. या महिलांसाठी जे. जे. रुग्णसमूहाच्या कामा रुग्णालयामध्ये ही सुविधा चोवीस तास विनाशुल्क उपलब्ध राहणार आहे.

सध्या रुग्णालयामध्ये दरमहा १००हून अधिक गर्भवती महिलांची सोनोग्राफी केली जाते. या निर्णयामुळे अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल, तसेच इतर ठिकाणी ज्या खेपा घालाव्या लागतात, त्या टळतील. 'बाळ आणि आईच्या आरोग्यासाठी या सुविधेची उपलब्धता उपयुक्त ठरेल', असा विश्वास कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी व्यक्त केला.

यापूर्वी ही सुविधा सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होती. या वेळेनंतर आलेल्या महिलांना सोनोग्राफीसाठी इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. सोनोग्राफीची सुविधा खर्चिक असल्याने सर्व गरजू महिलांना ही सुविधा आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने कामा रुग्णालयातील ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

सोनोग्राफीसाठी दोन नवीन मशिन आणण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांची सोनोग्राफी करण्यासाठीही नवीन मशिन आणण्यात आले आहे. गर्भवती महिलांची सोनोग्राफी मोफत होणार असल्याचेही डॉ. पालवे यांनी सांगितले.


हेही वाचा

कोरोनाची नवीन लक्षणे, घशाच्या गंभीर संसर्गाने त्रस्त

ठाणे महानगरपालिका सज्ज, कोविड वॉर रूमची स्थापना

पुढील बातमी
इतर बातम्या