घरोघरी मिळणार वन रुपी क्लिनिकची सेवा

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

सध्या मुंबईसह राज्यभरात रक्तदाबाच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रक्तदाबाचं वेळीच निदान झालं तर भविष्यात होणाऱ्या अनेक विकारांना आळा घालता येऊ शकतो. त्यामुळेच वन रुपी क्लिनिकने पुढाकार घेत घरोघरी जाऊन लोकांच्या रक्तदाबाच्या तपासण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ५ एप्रिलपासून रक्तदाब तपासणी शिबीर राबण्यात येणार आहे.

बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक मुंबईकरांना विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हदयविकाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या अधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबतच नोकरदार महिला यांची वाढती संख्या ही धोक्‍याची घंटा आहे. नोकरदारांना कार्यालयीन कामामुळे त्याच्या आरोग्याकडे लक्ष दयायला वेळ मिळत नाही. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावरही बेतू शकतं. जीवनशैलीशी निगडीत आजारांचे वेळीच निदान होण्यासोबत नियमित डॉक्‍टरांकडून औषधोपचार होणं तितकंच गरजेचं आहे. 'रुग्णसेवेचं हित' लक्षात घेत 'वन रुपी क्‍लिनिक' ने आरोग्यसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरोघरी जाऊन रक्तदाब तपासण्या करण्याचं ठरवलं आहे.

वन रुपीचे आरोग्यसेवक तुमच्या दारी

येत्या ५ एप्रिलपासून वन रुपी क्लिनिकचे आरोग्यसेवक हे नागरिकांच्या घरी जाऊन तपासण्या करणार आहेत. अवघ्या एक रुपयात आरोग्यसेवक हे रक्तदाब चाचण्या करतील. त्यामुळे नागरिकांना घर बसल्या या चाचण्यांचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर दर १५ दिवसांनी आरोग्यसेवक पुन्हा रुग्णांकडे जाऊन त्यांची विचारपुस करतील.

११ महिन्यात ४७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात १५ हजार हे फक्त रक्तदाबाचे रुग्ण आहेत. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातून रक्तदाबाचं निदान होण्यास मदत होणार आहे. शिवाय, या उपक्रमातून १ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक

कसा असणार उपक्रम?

येत्या ५ एप्रिलपासून घरोघरी जाऊन वन रुपी क्लिनिकचे आरोग्यसेवक ही सुविधा देणार आहेत. मध्य रेल्वेच्या भायखळा, दादर, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकापासून ही सेवा सुरू होणार आहे. या स्थानकात वन रुपी क्लिनिकचे सिस्टर्स आणि असिस्टंट पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही परिसरातील घरा-घरांत जाऊन मोफत रक्तदाब तपासण्या करणार आहेत.

वन रुपी क्लिनिकचा ११ महिन्यांचा प्रवास

आतापर्यंत मुंबईत वन रुपीचे १७ क्लिनिक्स झाले आहेत. या सर्व क्लिनिक्समध्ये झिरो एररसाठी बारकोड सिस्टिम बसवण्यात आली आहे. ज्यात सर्व रेकॉर्ड्स ऑनलाईन ठेवण्यात आले आहेत.

मेंबरशीपची सुविधा

वन रुपी क्लिनिकने कुटुंबियांसाठी मेंबरशीप कार्डची सुविधा दिली आहे. या मेंबरशीप कार्डमध्ये अत्यंत माफक दरात तपासणी करून मिळणार आहे.

टॉक टू डॉक्टरची सुविधा

वन रुपी क्लिनिकडून येत्या ५ एप्रिलपासून टेली कन्सलटन्सची सुविधा देखील सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे रुग्णांना थेट डॉक्टरांशी बोलता येणार आहे. त्यासाठी ९३४९३४७२७२ या नंबरवर संपर्क साधू शकता.


हेही वाचा - 

वन रुपी क्लिनिकच्या कामगिरीने केंद्र सरकार खूश, म्हणूनच घेतला 'हा' निर्णय!

'वन रुपी'चं महिलांना गिफ्ट, २०० रुपयांत वैद्यकीय तपासणी सुविधा

पुढील बातमी
इतर बातम्या