महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट?

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील दक्षता घेण्यास सुरुवात केली असून नागरिकांना सातत्याने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

देशात मागील २४ तासांत ४७ हजार ९०५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, ५५० कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत बुधवारी पहिल्यांदाच ८ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार दिल्ली सरकारने ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचं म्हटलं आहे. यामुळे सगळीचं राज्य सावध झाली आहेत. दिवाळी आणि त्यानंतरचे पुढील थंडीचे दिवस कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे

त्यातच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. एवढंच नाही, तर डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील डॉक्टर, सरकारी रुग्णालये, जि्ल्हा रुग्णालये, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याची सूचना केली आहे.

ताप, फ्लू यांसारखी लक्षणं दिसत असल्यास वेळेत सर्वे झाला पाहिजे.  शहरी आणि ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक्सनी दररोज अहवाल सादर करावेत, जेणेकरून परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल. शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या घटत असली, तरी रोज होणाऱ्या चाचण्या कोणत्याही परिस्थितीत थांबवता कामा नयेत. सर्व कोविड सेंटर्सनी सज्ज राहावं. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत, अशा सूचना देखील डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत. 

सध्या राज्यात ९२ हजार कोविड अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास खाटांचं नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हा टास्क फोर्स देखील नेमण्यात आला आहे.

(second wave of coronavirus might to spread in maharashtra)

हेही वाचा- दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे- उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या