केईएम रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयातील कॅन्टीनमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे केईएम प्रशासनाने तातडीने हे कॅन्टीन सील केलं आहे.

केईएम हॉस्पिटलमध्ये शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयाच्या आवारात मोठे कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये 27 कर्मचारी काम करत आहेत. यापैकी २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॅन्टीन आता सील करण्यात आलं आहे.  कॅन्टीनच्या दोन वरिष्ठ व्यवस्थापकांमध्ये कोरोनाचे लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती सुत्रांनी दिली. इतरांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

आपल्याला कोरोनाचा अधिक धोका आहे हे या सर्व कर्मचाऱ्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध देण्यात येत होते, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं. आतापर्यंत केईएममधील ३३० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकांसहीत ९८ सहाय्यक कामगार, ७६ नर्सेस आणि ७५ डॉक्टरांचा समावेश आहे.  सध्या १३५ वैद्यकीय कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत.


हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?


पुढील बातमी
इतर बातम्या