मुंबईतील सरकारी रुग्णालयात दररोज अनेक रुग्णांना दाखल करण्यात येतं. मात्र, मुंबईतील सरकारी रुग्णालयांपैकी काही महत्वाच्या रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नुकताच मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतल्यानं साथीच्या आजारांं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं पालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात अजूनही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. दिवसागणिक या रुग्णालयांवर रुग्णसेवेचा बोजा वाढत आहे.
मुंबईतील जीटी, कामा, वांद्रे नागरी स्वास्थ्य केंद्र, सायन व केईएम अशा महत्त्वाच्या रुग्णालयांतील ५० टक्के व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत आहेत. केईएम रुग्णालयातील ३२ व्हेंटिलेटर्स बंद आहेत. सायन रुग्णालयातील ४ व्हेंटिलेटर्स बंद आहेत. सर जे.जे. समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या वांद्रे नागरी स्वास्थ्य केंद्रातील २ व्हेंटिलेटर्स २०१४ पासून बंद आहेत. गोकूळदास तेजपाल रुग्णालयात १२ पैकी ४ व्हेंटिलेटर्स बंद आहेत. तसंच, कामा रुग्णालयातील ४ व्हेंटिलेटर्सपैकी १ बंद असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतील सरकारी रुग्णालयात कमी पैशात रुग्णांना उपचार घेता येतात. मात्र, या रुग्णालयातील महत्वपूर्ण असलेली व्हेंटिलेटर्स सेवा बंद असल्यानं रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच, बऱ्याचदा अनेक रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरला पर्याय म्हणून अॅम्ब्यू पंपची सेवा देण्यात येते. परंतु, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यानं अॅम्ब्यू पंप वापरून देखील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सायन रुग्णालयात घटली होती.
हेही वाचा -
रामदास आठवलेंनी दत्तक घेतलेल्या 'त्या' बिबट्याचा मृत्यू
ज्यांना वेतन करार अमान्य आहे, त्यांना बोनस देऊ नये; बेस्टचा निर्णय