जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इमाम अहमदचा अबुधाबीतील बुर्जील रुग्णालयात सोमवारी सकाळी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
अबुधाबीतील बुर्जील रुग्णालयात विविध आजारांशी संबंधित 20 तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली इमानवर उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे 4.35 वाजता तिचा मृत्यू झाला. हृदय विकार आणि किडनी निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अबुधाबीला जाण्यापूर्वी तिच्यावर मुंबईतल्या चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात डॉ. मुझफ्फल लकडावाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. तिला 11 फेब्रुवारीला इजिप्तहून खास विमानातून मुंबईत आणण्यात आले होते. सैफी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तिचे वजन 500 किलो होते. इमानसाठी सैफी रुग्णालयात सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून वेगळा कक्ष उभारण्यात आला होता. त्यावेळी इमानला जडपणासोबतच हायपर टेन्शन, मधुमेह यांसारख्या व्याधीही जडल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांसाठी इमानवर उपचार करणे हे एक आव्हान होते.
सैफी रुग्णालयात उपचार घेत असताना तिने दोन महिन्यात जवळपास 242 किलो एवढे वजन कमी केले होते, अशी माहिती सैफी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली होती. त्याचवेळी डॉक्टर आमच्याशी खोटं बोलल्याचा आरोप तिची बहीण शायमा सेलिम हिने केला होता. त्यानंतर तिच्यावर अबुधाबीत बुर्जील रुग्णालयात उपचार सुरू होते.
हेही वाचा -