सोशल मीडिया ठरला झीनतसाठी वरदान!

मुंबई/ औरंगाबाद - गेल्या दहा वर्षांत सोशल मीडियाचे स्वरूप बदलत असून, आता याचा उपयोग भारतातील गरजू आणि गरीब रुग्णांना होत आहे. फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅपने तर युवावर्गाला भुरळ पाडली असून, याच तरुण वर्गाने केलेल्या मदतीमुळे औरंगाबाद येथील झीनतला नवीन जीवनदान मिळाले आहे. 

औरंगाबाद येथील पेशाने शिक्षक असलेल्या झीनत कौसर खान (38) यांची हालचाल वाढलेल्या वजनामुळे पूर्णपणे थांबली होती. आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असून, त्यांचे पती हे उदरनिर्वाहासाठी टेलरिंगचे काम करतात आणि त्यांची महिन्याभराची कमाई फारच तुटपुंजी असून, वजन कमी करण्यासाठी लागणारा चार लाखांचा खर्च त्यांना कधीच परवडणारा नव्हता. मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ट हास्पिटलचे बॅरिएट्रिक आणि मेटॅबोलिक सर्जन डॉ. रमण गोयल या वर्षी जानेवारीमध्ये झीनत यांना बघण्यासाठी औरंगाबादला गेले असता झीनत यांनी डॉक्टरांची भेट घेतली. वाढत्या वजनामुळे झीनत यांची शारीरिक हालचाल थांबल्यामुळे त्यांच्या 2 मुलांना सांभाळायला फार कठीण जात होते आणि याचबरोबर उच्च रक्तदाबामुळे त्यांचे शारीरिक संतुलन दिवसेंदिवस खालावत जात होते. 

वॉक्हार्ट हॉस्पिटलचे "लाईफ विन्स" म्हणजेच आपल्या बहुमोल जीवनावर विजय मिळविणे या घोषवाक्यानुसार मुंबईमध्ये पहिली बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केलेल्या डॉ. रमण गोयल यांनी सोशल मीडियाद्वारे झीनत खानच्या सर्जरीसाठी लागणाऱ्या वैद्यकीय सामान आणि मेडिसिनसाठी खर्च उभे करण्याचे आवाहन केले. बारा दिवसांतच दीड लाख रुपयांचा निधी जमा झाला आणि वॉक्हार्ट हॉस्पिटलने झीनतच्या हॉस्पिटलमध्ये राहण्याचा आणि पुढील उपचाराचा खर्चही माफ केला. याविषयी अधिक माहिती देताना वॉक्हार्ट हास्पिटलचे बॅरिएट्रिक आणि मेटाबोलिक शल्यचिकित्सक डॉ. रमण गोयल म्हणाले, " जगात लठ्ठ व्यक्तींमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागत असून, दुसऱ्या स्थानावर चीन असून, पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. दर तीन भारतीय व्यक्तींपैकी एक व्यक्ती लठ्ठपणा किंवा प्रमाणित वजनापेक्षा जास्त वजनाची असून, शरीराचे वाढते वजन हा एक आजार असून त्याची योग्य ती चिकित्सा केली पाहिजे. भारतामध्ये लठ्ठ व्यक्तींना सामाजिक आणि कौटुंबिक अपमानाला वारंवार सामोरे जावे लागते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते. दीडशे किलो वजन असलेल्या झीनतवर आम्ही 15 मार्च रोजी यशस्वी शस्रक्रिया केली असून, एका वर्षामध्ये तिचे वजन 70 ते 80 किलोंनी कमी होणार आहे. झीनतला मदत करणाऱ्या सर्व सोशल मीडियातील देणगीदारांचे आणि वॉक्हार्ट हॉस्पिटलचे मी आभार मानतो कारण त्यांच्याच मदतीने झीनतवर मोफत शस्रक्रिया पार पडली आहे."

मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ट हॉस्पिटल आणि डॉ. रमण गोयल यांच्या संयुक्त प्रयत्नाने झीनत थोड्याच दिवसात शाळेमधील नोकरी सुरु करून कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळणार आहे. आपल्या दोन्ही मुलांना आपण उच्च शिक्षण देणार असल्याचा मानस यावेळी झीनत खान यांनी बोलून दाखविला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या