धारावी पुनर्विकासाचा नवा फाॅर्म्युला, ४ सेक्टरचा मिळून एकच सेक्टर

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • इन्फ्रा

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी हाती घेण्यात आलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प आजही कित्येक वर्षांनंतर कागदावरच आहे. रहिवाशांचा विरोध आणि तांत्रिक-आर्थिक अडचणींमुळे या प्रकल्पाकडे बिल्डरांनी पाठ फिरवल्याने प्रकल्प रखडला आहे. असं असताना हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डीआरपी)ने पुन्हा एक नवा फाॅर्म्युला आणला आहे. तो फाॅर्म्युला म्हणजे ४ सेक्टर मिळून १ सेक्टर करत पुनर्विकास मार्गी लावण्याचा.

'असा' आहे फाॅर्म्युला

जागेचे ४ सेक्टर करूनही पुनर्विकासासाठी बिल्डर पुढं येत नसल्यानं ४ सेक्टर एकत्रित करून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवर कंत्राटदाराच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा हा फाॅर्म्युला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

प्रतिसाद मिळेना

हा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी सर्वात आधी धारावीचे ५ सेक्टर करण्यात आले. त्यानुसार या ५ सेक्टरसाठी निविदा काढण्यात आल्या, पण बिल्डर या पुनर्विकासासाठी पुढे आले नाहीत. प्रयत्न करूनही बिल्डर पुढे न आल्यानं ५ सेक्टरपैकी एक सेक्टर (सेक्टर ५) म्हाडाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानुसार सेक्टर-५ चा पुनर्विकास म्हाडाकडून सुरू आहे, पण या पुनर्विकासानेही म्हणावा तसा वेग घेतलेला नाही.

सेक्टरचे केले सबसेक्टर

दरम्यान काही वर्षांपूर्वी डीआरपीने ४ सेक्टरसाठी पुन्हा निविदा काढल्या, पण या निविदांनाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डीआरपीने ४ सेक्टरचे १३ सबसेक्टर केले. या सेक्टरसाठी अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. तरिही डीआरपीला या छोट्या सेक्टरला बिल्डरकडून कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता आहे.

म्हणून १ सेक्टरचा फाॅर्म्युला

त्यामुळेच आता ४ सेक्टर मिळून १ सेक्टर कऱण्याचा फाॅर्म्युला पुढे आणण्यात आला आहे. त्यानुसार आता हा फाॅम्युला मान्य होतो का आणि मान्य झाल्यास तो तरी यशस्वी होऊन रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागतो का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.


हेही वाचा-

माहीम नेचर पार्कचं आरक्षण कायम! गृहराज्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र नेचर पार्क 'पार्क'च राहणार- डीआरपी


पुढील बातमी
इतर बातम्या