Exclusive: म्हाडाची लाॅटरी डिसेंबरमध्ये फुटणार; १३०० घरांसाठी ५ नोव्हेंबरला जाहिरात

म्हाडाच्या लाॅटरीची आणि लाॅटरीसाठीच्या जाहिरातीची प्रतिक्षा गेल्या कित्येक महिन्यांपासून म्हाडाच्या माध्यमातून घराचं स्वप्न पूर्ण करू पाहणारे इच्छुक पाहत आहेत. आता मात्र ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ नोव्हेंबरला लाॅटरीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाॅटरी फुटेल आणि या लाॅटरीत अंदाजे १३०० घरं असतील, असंही सुत्रांनी सांगितलं आहे.

किमतीमुळे लाॅटरी रखडली

मे २०१८ मध्ये मुंबईतील घरांसाठी लाॅटरी फुटणार होती. मात्र, मुंबई मंडळाकडे लाॅटरीसाठी पुरेशी घरंच नसल्यानं ही लाॅटरी रखडली ती रखडलीच. तर घर शोधून काढत घरांचा आकडा १००० च्या वर नेला. पण घरांच्या किंमती खूपच वाढल्यानं मुंबई मंडळासाठी नवी डोकेदुखी झाली. किंमतींवरून झालेल्या टीकेनंतर आणि महागडी घरं परत करण्याचा आकडा वाढल्यानंतर म्हाडानं घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेत तसं धोरण तयार केलं. हे धोरण तयार करण्यामध्ये वेळ गेल्यानं लाॅटरी पुन्हा रखडली. 

किमती घटल्या

 आता किंमतीचं नव धोरण तयार झालं असून या धोरणानुसार म्हाडाच्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर प्रिमियमच्या रुपानं दुरूस्ती मंडळाकडून मिळालेल्या घरांच्या विक्रीचंही धोरण म्हाडानं तयार केलं आहे. त्यामुळं अशी घरंही २० ते ३० टक्क्यांनी स्वस्त झाली आहेत. या नव्या धोरणानुसार घरांच्या किंमती निश्चित करण्याचं काम पूर्ण झाल्यानं आता मंडळानं जाहिरात काढण्याची तयारी सुरू केली आहे. 

२३ किंवा २४ डिसेंबरला फुटणार

त्यानुसार ५ नोव्हेंबरला आॅनलाईन जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्यापुढच्या ४५ दिवसांचा अवधी अर्जविक्री-स्वीकृतीसाठी दिला जाईल. या अनुषंगानं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाॅटरी फुटेल अशी माहिती सुत्रांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. तर २३ वा २४ डिसेंबर हा लाॅटरीचा मुहुर्त असण्याची शक्यताही सुत्रांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे घरांचा आकडा १२०० वरून १३०० च्या पुढं नेल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. 


हेही वाचा - 

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग, आतापर्यंत ४९ प्रस्तावांना मंजुरी

अवघ्या १४ मिनिटांत गाठता येईल एलिफंटा! सरकार बांधणार रोप-वे


पुढील बातमी
इतर बातम्या