कल्याण येथील निर्मल लाईफस्टाईलच्या अॅमेझाॅन प्रकल्पातील ग्राहक निर्बण दासगुप्ता यांना घराचा ताबा मिळेपर्यंत दरमहा १०. १० टक्क्यांनी व्याज देण्याचा निर्णय निर्मल लाईफस्टाईलनं घेतला. त्यानुसार डिसेंबर २०१७ पासून व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात झाली. पण तीन-चार महिन्यांपासून व्याजाची रक्कम १५ ते २५ दिवस उशीरा येत असून या महिन्यात तर ही रक्कम आलेलीच नाही.
बिल्डरनं एक तर घर वेळेत दिलं नाहीच, पण आता व्याजाची रक्कमही वेळेत देत नाही, असं म्हणत दासगुप्ता यांनी पुन्हा महारेराकडे धाव घेतली आहे. महारेराला एक पत्र लिहीत आपल्याला व्याजाची रक्कम मिळत नसल्याचं त्यांनी कळवलं आहे.
दासगुप्ता यांनी २०१३ मध्ये कल्याणमधील अॅमेझाॅन प्रकल्पात घर खरेदी केले. त्यानुसार घराची २९ लाखांची रक्कमही बिल्डरला अदा केली. करारानुसार दासगुप्ता यांना २०१७ मध्ये घराचा ताबा देण्यात येणार होता. पण हा ताबा न मिळाल्याने २०१७ च्या अखेरीस त्यांनी महारेराकडे बिल्डरविरोधात रितसर तक्रार केली. या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान बिल्डरने सामंजस्यानं प्रकरण सोडवू असं आश्वासन दिलं. त्याप्रमाणे बिल्डरनं जुलै २०२० घराचा ताबा देऊ असं सांगत तोपर्यंत दासगुप्ता यांना घराच्या रकमेच्या १०.१० टक्के रक्कम व्याज म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
डिसेंबर २०१७ पासून व्याजाची २१,५०० रुपयांची रक्कम दासगुप्ता यांच्या खात्यात जमा करण्याचंही बिल्डरनं मान्य केलं. डिसेंबरपासून तीन-चार महिने ही रक्कम वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होत होती. पण त्यानंतर हळूहळू रक्कम उशीरा जमा होऊ लागली. आॅगस्टमध्ये तर ही रक्कम आलेलीच नाही. त्यामुळं घर नाही तर निदान व्याज तरी वेळेत द्या, असं म्हणत दासगुप्ता यांनी पुन्हा बिल्डरची तक्रार महारेराकडे केली आहे. आता महारेरा यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
बिल्डरांना चाप हवा
बिल्डर घराची रक्कम वसूल करतात. पण घर वेळेवर देत नाहीत. इतकंच नव्हे तर महारेरामध्ये गेल्यानंतरही बिल्डरांची मनमानी सुरूच राहते. त्यामुळंच आपण या बिल्डरविरोधात पत्राद्वारे पुन्हा तक्रार केल्याची माहिती दासगुप्ता यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे. तर अशा बिल्डरांना दणका दिला पाहिजे जेणेकरून इतर बिल्डरांनाही चाप बसेल नि ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
याविषयी निर्मल लाईफस्टाईलचं खासगी पीआर सांभाळणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंबंधी निर्मल लाईफस्टाईलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकणार नाही असं सांगितलं आहे. मात्र त्याचवेळी आॅगस्टमध्ये रक्कम देण्यास उशीर होईल असं कळवल्याचं सांगितलं आहे. दासगुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, मात्र बिल्डरकडून नेहमीच रक्कम जमा करण्यास उशीर होत असल्याची वेगवेगळी कारणं दिली जातात. पण हा उशीर आता महिन्यानं वाढला आहे.
हेही वाचा -
गिरणी कामगारांना पाहिजेत संक्रमण शिबिराची घरे!
याचिकाकर्त्यांनी १० हजार कोटी न्यायालयात जमा करावे - एमएमआरडीए