प्रीमियम फायद्याचा, म्हाडाच्या तिजोरीत १०० कोटींची भर!

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तिजोरीत नुकतीच १०० कोटी रुपयांची भर पडली आहे. म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ५ पुनर्विकास प्रस्तावांना मुंबई मंडाळानं प्रीमियम आकारत परवानगी दिली आहे. त्यातून मुंबई मंडळाला १०० कोटी मिळाल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली आहे. मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केवळ ५ प्रकल्पाच्या परवानगीतून मुंबई मंडळाला १०० कोटींची रक्कम मिळाली असून मंडळाला अजून ४० हून अधिक प्रस्तावाद्वारेही प्रीमियम मिळणार आहे. ही रक्कम भविष्यात आणखी मोठी होणार असून मुंबई मंडाळाला यातून मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

धोरणात बदल

मुंबईत म्हाडाच्या ५६ वसाहती असून यात ११४ लेआऊट आहेत. दरम्यान सप्टेंबर २०१० पासून म्हाडा वसाहतीतील जीर्ण इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. म्हाडाने म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास धोरणात बदल करत पुनर्विकास प्रस्तावांना केवळ हाऊसिंग स्टाॅक आकारतच परवानगी देण्याचा निर्णय घेतला. प्रीमियमचा पर्याय रद्द करत हाऊसिंग स्टाॅकचाच पर्याय दिल्यानं बिल्डरांनी पुनर्विकासातून काढता पाय घेतला नि पुनर्विकास रखडला तो रखडलाच. पुनर्विकास रखडल्यानं अखेर म्हाडानं धोरणात पुन्हा बदल करत हाऊसिंग स्टाॅक आणि प्रीमियमचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून दिला आहे.

४९ प्रस्तावांना मंजुरी

धोरण बदलल्याने आता बिल्डर आणि सोसायट्या पुन्हा पुनर्विकासासाठी पुढं येत आहेत. त्यानुसार गेल्या काही महिन्यांतच मुंबई मंडळाकडे १०७ पुनर्विकास प्रस्ताव सादर झाले आहेत. त्यातील ४९ प्रस्तावांना मुंबई मंडळानं प्रीमियमअंतर्गत परवानगी दिली आहे. तर इतर प्रस्तावांची परवानगीची प्रक्रिया चालू आहे. असं असताना मंजुर ४९ प्रस्तावांमधील ५ प्रस्तावांचा प्रीमियम मुंबई मंडळाकडे जमा झाला आहे. जमा झालेली प्रीमियमची रक्कम १०० कोटींच्या घरात असल्यानं याचा मुंबई मंडळाला चांगलाच फायदा होताना दिसत आहे. तर भविष्यात इतरही प्रस्तांवाचा प्रीमियम जमा होणार असल्यानं मुंबई मंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडणार हे नक्की.


हेही वाचा-

म्हाडा लाॅटरीतील घरं महाग, मधू चव्हाणांचा म्हाडाला घरचा आहेर

म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाचे ७० कोटी द्या; महापौर, आयुक्तांकडे मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या