गोरेगावातल्या 'त्या' जमिनीवर म्हाडा बांधणार ३००० घरं

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

तब्बल दोन दशकांहून अधिकची न्यायालयीन लढाई..त्यात जिद्दीने मिळवलेला विजय...त्यानंतर ताब्यात आलेल्या जमिनीवरची अतिक्रमणे हटवण्याची कसरत..आणि अखेर घरं बांधण्यासाठी खुली झालेली सुमारे २५ एकर जमीन. गोरेगाव पूर्व परिसरातल्या 'त्या' ऐतिहासिक जमिनीवर लवकरच म्हाडाकडून 3000 घरे बांधण्यात येणार आहेत. या जमिनीवर घरे बांधण्यासाठी महिन्याभरात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अभियंत्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे लवकरच गोरेगावमध्ये सर्वसामान्यांसाठी म्हाडाची 3000 घरे उपलब्ध होणार आहेत.

गोरेगाव पूर्व पहाडी येथे इनऑर्बिट मॉलजवळ म्हाडाच्या मालकीची 25 एकर जमीन आहे. ही जमीन 50 वर्षांपूर्वी सरकारकडून गायरान जमीन म्हणून आपणास देण्यात आल्याचे सांगत कुसुम शिंदे नामक महिलेने ही जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला होता. ही जमीन या महिलेने कालांतराने गुंदेचा बिल्डरला विकून टाकली आणि तेथूनच मग म्हाडाची न्यायालयीन लढाई जवळपास 25 वर्षांपूर्वी सुरू झाली. शहर दिवाणी न्यायालयापासून थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत म्हाडाने या जमिनीसाठी लढा दिला आणि ही लढाई जिंकलीही.

महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात म्हाडाच्या विरोधात, बिल्डरची बाजू मांडण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ वकील पी. चिंदबरम उभे होते. मात्र तरीही चिंदबरम यांना ही लढाई जिंकता आली नाही. म्हाडाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय तर दिलाच, पण बिल्डरला 1 कोटींचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम कमी करण्याची पी. चिंदबरम यांची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली होती.


हेही वाचा

बीडीडीत बायोमेट्रिक सर्वेक्षण करणारच - प्रकाश मेहता

म्हाडात पैसे घेऊन अभियंत्यांची बदली? गृहनिर्माण विभागाकडून चौकशी

म्हाडाचं घर देण्याच्या नावाने कोट्यवधींचा गंडा घालणारी टोळी अटकेत


इतका संघर्ष, आटापिटा करून जी जमीन मिळवली त्या जमिनीवर दीड वर्षे झाली तरी अद्याप म्हाडाकडून घरे बांधण्यात आलेली नाहीत. दरम्यानच्या काळात या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठीही म्हाडाला मोठी कसरत करावी लागली होती. आता जमीन ताब्यात आली असून अतिक्रमणेही हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता जमिनीवर घरे बांधण्यास विलंब का होत आहे? याची विचारणा केली असता या अभियंत्याने घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू असून निविदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. शिवाय येत्या महिन्याभरात निविदा काढल्या जातील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करत त्वरीत घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, असेही या अभियंत्याने स्पष्ट केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या