३ टप्प्यांत होणार मोतीलाल नगर पुनर्विकास योजनेचं सादरीकरण

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर पुनर्विकास योजनेचं सादरीकरण ३ टप्प्यांत करण्यात येणार आहे. या सादरीकरणात म्हाडातर्फे प्रकल्पाची संकल्पना, अपेक्षित कालावधी, पुनर्विकासातून उपलब्ध होणारी घरे, मोकळी जागा इत्यादी तपशील रहिवाशांना समजावून सांगितला जाणार आहे. 

मायक्रो सिटी

याआधी मोतीलाल नगरमध्ये मायक्रो सिटी उभारण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी केली होती. ३० हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत म्हाडाला १८ हजार नवीन घरं उपलब्ध होणार आहेत. मोतीलाल नगरमध्ये मोकळ्या जागा भरपूर असल्याने रहिवाशांना संक्रमण शिबिरात जाण्याची गरज लागणार नाही. तर ३,६२८ कुटुंबांना थेट नव्या फ्लॅटमध्ये जाता येईल. या मायक्रो सिटीत निवासी वसाहतीसोबतच वृद्धाश्रम, महिलांसाठी हाॅस्टेल, हाॅस्पिटल इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रकल्पाची पायाभरणी आॅक्टोबर महिन्यात केली जाईल, अशी माहिती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रहिवाशांची नाराजी

या घोषणेनंतर रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत म्हाडाने कुठल्याही घोषणेआधी रहिवाशांना विश्वासात घेण्याची मागणी केली. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी या पुनर्वसन योजनेत निवासी घरं, व्यावसायिक गाळे, झोपड्या इ. मिळून ५, ३०२ जागांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवणार असल्याचं सांगितलं.  

प्रकल्पाचं सादरीकरण

येत्या २० मे रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण होईल. दुसऱ्या टप्प्यात स्थानिक रहिवाशांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थांसमोर सादरीकरण होईल. तर तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य लोकप्रतिनिधींसमोर सादरीकरण होईल. या सादरीकरणानंतर स्थानिक रहिवाशांच्या सूचना, मागण्यांचा विचार करण्यात येईल.

या प्रकल्पात स्थानिकांच्या सूचना विचारात घ्याव्यात, या मागणीसाठी मोतीलाल नगर विकास समितीच्या शिष्टमंडळाने म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांना निवेदन दिलं आहे. 


हेही वाचा-

म्हाडाच्या एका घरामागे तब्बल २१६ अर्ज

मुंबई, पुणे, नाशिकच्या म्हाडा लाॅटरीला आचारसंहितेचा फटका


पुढील बातमी
इतर बातम्या