चर्चगेटमध्ये मेट्रो 3 ची नाईटशिफ्ट- न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत मेट्रो 3 च्या कामास बंदी आहे. असे असताना बुधवारी रात्री 11 वाजता चर्चगेट परिसरात मेट्रो 3 कडून काम, मशीनची घरघर सुरू असल्याची बाब समोर आली आहे. न्यायालयाच्या आदेशालाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) जुमानत नसल्याचे म्हणत याबाबत या परिसरातील राहिवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

चर्चगेट येथील रवींद्र मेंशन परीसरात रात्री 11 वाजता मशीनची जोरात घरघर सुरू झाली नि परीसरातील राहिवाशांची झोपमोड झाली. काही राहिवाशांनी त्वरित साइटवर धाव घेत काम बंद करण्यास सांगितले. त्यांनतर थोडे पुढे जात कर्मचारी काम करू लागले. प्रचंड आवाजामुळे हैराण झालेल्या राहिवाशांनी अखेर 100 नंबर फिरवत पोलीस तक्रार दाखल केली. मग कुठे साडे बाराच्या दरम्यान पोलीस आल्यानंतर काम बंद केल्याची माहिती तक्रारदार नीना वर्मा यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.

याविषयी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याची माहिती येथील राहिवासी अश्विन नागपाल यांनी दिली आहे. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे म्हणत ध्वनीप्रदूषणाविरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या आणि ज्यांच्या याचिकेमुळे मेट्रो 3 ची नाइटशिफ्ट बंद झाली, अशा अॅड. रॉबिन जयसिंघानी यांनी ही बाब न्यायालयासमोर ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान याविषयी एमएमआरसी कडे विचारणा केली, मात्र त्यांच्या कडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या