प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एमएमआरडीए १० बूम लिफ्टस् ट्रक खरेदी करणार

मुंबईत सुरू झालेल्या मोनो रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच, मोनोच्या प्रवासी संख्येतही वाढ होत आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) मोनोच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. मोनोच्या प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास यामधून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएनं १० बूम लिफ्टस् ट्रक खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं आहे.

अग्निशमन दलाची मदत

मोनोमध्ये एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास मोनो रेल जागीच उभी करावी लागत असून त्यावेळी प्रवाशांचा खोळंबा होतो. अशावेळी प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागते. मोनोरेलचे अनेक मार्ग मुख्य रस्त्यांवर असल्यानं त्यावेळी वाहतूककोंडीसुद्धा होते. त्यामुळं अशा आपत्कालीन परिस्थितीतून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बूम लिफ्टस् ट्रक खरेदी करणार आहे.

सिंगापूरच्या कंपनीची निवड

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं यासाठी सिंगापूरमधील कंपनीची निवड केली आहे. त्या कंपनीबरोबर करारही करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांनंतर कंपनीचे तज्ञ मुंबईत येऊन मोनो रेलची स्थानके आणि मार्गाची पाहणीही करणार असल्याचं समजतं आहे.

आपत्कालीन परिस्थिती

'बूम लिफ्ट ट्रक' ही एकप्रकारची लिफ्ट असून, ट्रकमध्येच ही लिफ्ट असते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तो ट्रक घटनास्थळापर्यंत नेला जातो. हा, ट्रक जेसीबी मशीनसारखा जमिनीवर फिक्स्ड करून त्यातीत लिफ्ट बूम (उचलणं) करता येते. ही लिफ्ट क्षमतेनुसार शेकडो फूट वर उचलता येते आणि त्यातील लिफ्टमधून शेकडो टन वजन खाली आणता येते. त्यामुळं 'बूम लिफ्ट ट्रक'च्याआधारे प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढता येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक

प्रथम वर्ष प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन नोंदणी


पुढील बातमी
इतर बातम्या