दहिसर येथील आनंद नगर परिसरात असलेल्या मेट्रो स्थानकाच्या 'अप्पर दहिसर' स्थानकाचं नामकरण करण्यात आलं आहे. 'आनंद नगर' असं नाव ठेवण्यात आलं आहे. याबाबत विविध पक्षाच्या लोकांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे पाठपुरावा करत स्थानकाचे नाव बदलण्याबाबत विनंती पत्र दिले होते. त्यानुसार हे नाव बदलण्यात आलं असून याबाबत दहिसरकरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
अंधेरी पश्चिम डी एन नगर दहिसर मेट्रो २ च्या ट्रायल रनचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र दहिसरमध्ये स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये असंतोष व्यक्त होत होता. दहिसर क्षेत्र विस्तृत असलं तरी मेट्रो स्थानक हे पूर्णपणे आनंद नगरच्या सीमेत आहे. त्यामुळं येथील मेट्रो स्थानकाला अप्पर दहिसर हे नाव देणं स्थानिकांना मान्य नव्हते. त्यामुळं या नावाला त्यांच्याकडून विरोध सुरू होता.
याबाबत विविध पक्षाच्या शिष्टमंडळानी एमएमआरडीएच्या आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन देत नाव बद्दलण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार एमएमआरडीए आयुक्तांनी १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी स्थानिकांच्या या मागणीबाबत दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला पत्र दिले होते.
ज्याच्या उत्तरात त्यानी ही विनंती मान्य करत २४ नोव्हेंबर,२०२१ रोजी या स्थानकाचे नाव आता अप्पर दहिसर न राहता आनंदनगर मेट्रो स्टेशन करण्यात आले असुन याच नावाचा वापर पुढील सर्व अधिकृत प्रक्रियेसाठी करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.