सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचं काम तिसऱ्यांदा पुढं ढकललं!

मुंबईतील सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचे काम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले. ब्रिड जानेवारी महिन्यातच पाडण्यात येणार होता. परंतु, स्थानिक लोक आणि राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या कामाला विलंब झाला. त्यानंतर 28 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून सायन रोड ओव्हरब्रिज तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे या तारखेत बदल करण्यात आला. त्यावेळी 28 मार्च रोजी हा पूल पाडण्यात येईल, असे सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा सायन रोड ओव्हरब्रिज पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती देण्यात आली.

धारावी, लालबहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा आरओबी हा महत्त्वाचा पूल आहे. हा पूल बंद केल्याने पूर्व-पश्चिम वाहतूक विस्कळीत होईल आणि कुर्ल्यामार्गे वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल. सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याच्या आणि पुनर्बांधणीच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पूलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी एकूण 50 कोटी खर्च येणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान दोन अतिरिक्त लेन वाढवण्यात येणार आहे. ज्यामुळे एक्स्पेस गाड्या आणि लोकल गाड्या आपपल्या मार्गाने धावतील. यासाठी सायन रोड ओव्हरब्रिजची लांबी 30 मीटर वरून 49 मीटर वाढवण्याची गरज आहे.

सुरुवातीला 20 जानेवारी 2024 रोजी सायन रोड ओव्हरब्रिज पुनर्बांधणीच्या कामासाठी तोडण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. पंरतु, स्थानिक रहिवाशांचा विरोध आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्तक्षेपामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 28 फेब्रुवारी ही नवी तारीख निश्चित करण्यात आली. 

परंतु, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याने तीही पुढे ढकलण्यात आली. अखेर 28 मार्च रोजी सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, यंदा निवडणुकीच्या कारणास्तव हा पूल पाडण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचे बोलले जात आहे.  


इतर बातम्या