मुंबईत मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाती बातमी आहे. कारण आता मेट्रोच्या तिकीट दराबाबत प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबई मेट्रोच्या घाटकोपर वर्सोवा मेट्रो १ मार्गावरील तिकीट दराचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे. असं असतानाही मेट्रोच्या अन्य मार्गांवर मात्र तिकीट दर प्रवाशांना परवडणारे असणार आहेत. सध्या कामं सुरू असलेल्या आणि भविष्यात कार्यान्वित होणाऱ्या मेट्रो मार्गावर किमान भाडं १० रुपये, तर कमाल भाडं ८० रुपये असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या मेट्रो १ मार्गाचं कमाल भाडं ४० रुपये आहे. मात्र हा मार्ग फक्त ११ किलोमीटरचा आहे.
मुंबई व आसपासच्या परिसरात एमएमआरडीए १४ मेट्रो प्रकल्प राबवत आहेत. यामधील कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३ हा भूमिगत मार्ग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन राबवत आहे. हा मार्ग सर्वात मोठा म्हणजे ३३.५ किलोमीटरचा आहे. त्यानंतर एमएमआरडीएच्या अखत्यारीतील वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली हा ३२.३ किलोमीटरचा मार्ग आहे.
या सर्व मार्गांचं तिकीट दर किती असणार याबाबत प्रवाशांना उत्सुकता आहे. मात्र अगदी शेवटच्या टोकापर्यंत जरी प्रवास केला तरी कमाल भाडे ८० रुपये असणार आहे. तर पहिल्या ३ किलोमीटरला फक्त १० रुपये आकारले जाणार आहेत.
मेट्रो १ प्रकल्प हा सार्वजनिक खाजगी तत्त्वावर राबवण्यात आला असल्यानं त्यात खासगी कंपनीची गुंतवणूक होती. त्यामुळं त्यांचे तिकीट दर जास्त आहेत. परंतु, अन्य मेट्रो मार्ग एमएमआरडीए म्हणजेच राज्य सरकार बांधत असून त्यात सरकारची गुंतवणूक असून, सरकार सार्वजनिक वाहतुकीचा तिकीट दर कमी ठेवू शकते.
हेही वाचा -
पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, १८ लोकल फेऱ्या रद्द
राज ठाकरेंसोबत बैठक, फडणवीसांनी पहिल्यांदाच केलं भाष्य