समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना समुद्राच्या शांत, निर्मनुष्य वातावरणात काही क्षण घालवायला का नाही आवडणार? त्यात जर एका आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मिळाली तर? क्या बात... तुम्ही म्हणाल क्रूझ वैगरे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना थोडी परवडणार? हे तर श्रीमंतांचे चोचले. पण नॉट टू वरी. तुम्हाला परवडेल अशीच आहे मुंबई टू गोवा जाणारी ही क्रूझ.
मुंबई ते गोवा आपण विमानानं किंवा एक्स्प्रेसनं नेहमीच जातो. पण एखाद्या आलिशान क्रूझचा आनंद घेण्याची संधी यावेळी मुंबईकरांना देखील मिळाली आहे. मुंबईकरांना जलवाहतुकीचा वेगळा अनुभव मिळावा, यासाठी मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूझ सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून २४ ऑक्टोबरपासून ही क्रूझ सुरू होणार आहे. २० ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास उपस्थिती असणार आहे.
क्रूझची खासियत
जपानमध्ये बनवलेल्या या क्रूझचं नाव कान्होजी आंग्रें यांच्या नावावरुन आंग्रिया ठेवण्यात आलंय. अांग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी ही क्रूझ सेवा सुरू केली आहे. या आलिशान १३२ मीटर लांब, १७ मीटर रुंदीच्या क्रूझवर २ अल्पोपाहार गृह, बार, तरण तलाव, छोटेखानी गोल्फ क्लब अशा सुविधा देण्यात आल्या अाहेत. अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असलेली आंग्रिया पर्यावरण पूरकही आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आलंय. एकाच वेळी १ हजार लोकांना क्षणात सुरक्षितपणे बाहेर काढण्याची क्षमता असलेली उपकरणं यावर बसवण्यात आलीत.
एका क्रूझमध्ये ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करू शकतील. मुंबईत ही क्रूझ माझगावच्या भाऊचा धक्का इथून सुटणार आहे. २४ ऑक्टोबरनंतर रोज संध्याकाळी ५ वाजता ही बोट भाऊच्या धक्का इथून निघेल ती दुसऱ्या दिवशी ९ वाजता गोव्यात पोहोचेल. या क्रूझवर १०४ खोल्या आहेत ज्यात ३४० प्रवाशांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आलीय. प्रत्येक खोली खास जपानी शैलीत सजवण्यात आलीय. १५ ते १६ तासांच्या प्रवासात प्रवाशांना उत्तम जेवण, अल्पोपाहार आणि मनोरंजनाची मेजवानी मिळेल. मुंबई गोवा सफर करताना प्रवाशांना या परिसरातील जलचरांची ओळख व्हावी यासाठी क्रूझवर मार्गदर्शक असेल.
क्रूझने प्रवास करायचा विचार करत असला तर खिसा थोडा हलका करावा लागेल. तिकीटाची किंमत 6 हजार रुपयांपासून सुरू होत आहे. क्रूझने प्रवास करताना मुंबई – गोव्याच्या किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद तर घेता येणारच आहे. पण याशिवाय तुम्हाला दोन वेळचं जेवण आणि नाश्ता मिळणार आहे. तसंच स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहण्याचा आनंदही घेऊ शकता. क्रूझमधील कर्मचारी तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर असतील. तसंच परिसराचं ऐतिहासिक महत्व तुम्हाला सांगतील.
कान्होजी आंग्रे नावाचे मराठा सरदार शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. कान्होजींनी या प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीचं रक्षण करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नावावरून महाराष्ट्र आणि गोव्याच्या दरम्यान प्रवाळांचं एक मोठं बेट आहे, त्याला आंग्रिया बेट असं नाव पडलं. आणि त्या बेटावरून या क्रूझला 'अांग्रिया' हे नाव देण्यात आलं आहे.
हेही वाचा